भारताने लुटले विजयाचे सोने...
By Admin | Updated: October 12, 2016 07:05 IST2016-10-12T07:05:44+5:302016-10-12T07:05:44+5:30
अजय ठाकूर आणि प्रदीप नरवाल यांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर यजमान आणि संभाव्य विजेत्या भारतीय संघाने विश्वचषक कबड्डी स्पर्धेत सलग दुसरा विजय

भारताने लुटले विजयाचे सोने...
अहमदाबाद : अजय ठाकूर आणि प्रदीप नरवाल यांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर यजमान आणि संभाव्य विजेत्या भारतीय संघाने विश्वचषक कबड्डी स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवताना बांगलादेशला ५७-२० असे लोळवले. या धमाकेदार विजयासह यजमानांनी ‘अ’ गटामध्ये ११ गुणांसह अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
पहिला गुण बांगलादेशने जिंकल्यानंतर संपूर्ण सामन्यात भारताचा अपेक्षित दबदबा राहिला. भारतीयांनी केलेल्या जबरदस्त आक्रमणापुढे बांगलादेशचा शेवटपर्यंत निभाव लागला नाही. तब्बल ४ वेळा लोण चढवून भारतीयांनी बांगलादेशच्या आव्हानातली हवा काढली.
मध्यंतरालाच भारताने २७-१० अशी १७ गुणांची एकतर्फी आघाडी सामन्याचा निकाल स्पष्ट केला. यानंतर बांगलादेशला केवळ १० गुण मिळवता आले. तर, भारतीयांनी बांगला खेळाडूंना कबड्डीचे धडे देताना सहज बाजी मारली.
गेल्या दोन सामन्यांत लौकिकानुसार खेळण्यात अपयशी ठरलेल्या अजय ठाकूरने या सामन्यात आपल जलवा दाखवताना सर्वाधिक ११ गुणांची वसुली केली. तर, प्रदीप नरवालनेदेखील खोलवर चढाया करताना ८ गुण कमावले. तसेच, सुरेंद्र नाडा आणि संदीप नरवाल यांच्या भक्कम पकडीमध्ये बांगलाचे चढाईपटू अडकत गेले.
बांगलादेशकडून कर्णधार अरुदुझमन मुन्शी याने एकाकी
झुंज देताना आक्रमणात ६ गुणांची कमाई केली. तर, फेरदुस शेखने ४ गुण मिळवताना चांगल्या पकडी केल्या.
(वृत्तसंस्था)