भारत-कोरिया डेव्हिस चषक लढत आजपासून
By Admin | Updated: July 14, 2016 18:55 IST2016-07-14T18:55:27+5:302016-07-14T18:55:27+5:30
एकेरीतील खेळाडूंच्या जखमा तसेच रिओ आॅलिम्पिकला जाणाऱ्या दुहेरीच्या जोडीदरम्यान असलेल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर भारताची आशिया ओसियाना डेव्हिस चषक टेनिस लढतीत

भारत-कोरिया डेव्हिस चषक लढत आजपासून
चंदीगड : एकेरीतील खेळाडूंच्या जखमा तसेच रिओ आॅलिम्पिकला जाणाऱ्या दुहेरीच्या जोडीदरम्यान असलेल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर भारताची आशिया ओसियाना डेव्हिस चषक टेनिस लढतीत आज शुक्रवारपासून कोरियाविरुद्ध गाठ पडत
आहे. ही लढत भारत जिंकेल, असा दावा करण्यात येत आहे. युकी भांबरी आणि सोमदेव देवबर्मन जखमी असल्याने २१ वर्षांचा रामकुमार रामनाथन पहिल्यांदा डेव्हिस चषकात खेळेल.
फोरहॅन्डचे फटके मारण्यात पटाईत असलेल्या रामनाथनसाठी ही मोठी संधी असेल. कोरिया संघातही सर्वोत्कृष्ट असलेल्या सियोनग चान याचा समावेश आहे. याशिवाय एटीपी एकेरीत रँकिंग पटकविलेले युनसियोंग चूंग आणि होंग चूंग हे संघात आहेत. दुसरीकडे भारतीय संघात अनुभवी खेळाडूंचा भरणा आहे. भारताने या लढतीसाठी ग्रासकोर्टला प्राधान्य दिले. कोरिया संघातील खेळाडूंमध्ये बेबनाव आहे. दोन्ही कोरियाचे पारंपरिक मतभेद खेळाडूंमध्ये समन्वय घडविण्यातील मोठा अडथळा आहेत. भारतीय संघातील दुहेरी जोडी बोपन्ना-पेस यांच्यात या लढतीच्या निमित्ताने समेट घडून येण्याची शक्यता आहे.
त्यांच्या खेळात ताळमेळ निर्माण होणार असेल तर भारतीय संघाला याचा लाभ रिओ आॅलिम्पिकदरम्यान होऊ शकतो.
२००८ साली ग्रासकोर्टवर भारताने जपानचा ३-२ ने निसटता पराभव केला होता.
भारत कोरिया लढतीतील विजेत्या संघाला विश्व ग्रुप प्ले आॅफमध्ये स्थान मिळेल. तेथे चीन किंवा उझबेकिस्तान यांच्याविरुद्ध सामना खेळावा लागेल.
चंदीगड क्लबच्या ग्रासकोर्टवर याआधी २०१२ च्या डेव्हिस चषक लढतीत भारताने न्यूझीलंडचे यजमानपद भूषविले होते.
हरियाणा- पंजाबचे राज्यपाल कप्तानसिंग सोळंकी यांनी राजभवनात झालेल्या सोहळ्यात लढतीचा ड्रॉ काढला. यावेळी उभय संघातील खेळाडू, कर्णधार आणि अ.भा. टेनिस संघटनेचे अध्यक्ष अनिल खन्ना उपस्थित होते. (वृत्तसंस्था)