भारत इतिहास घडविण्यास उत्सुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 04:47 IST2016-07-20T04:47:55+5:302016-07-20T04:47:55+5:30
टीम इंडिया गुरुवारपासून वेस्ट इंडीजमध्ये खेळल्या जाणाऱ्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत अनोखा इतिहास नोंदवण्याच्या निर्धाराने उतरणार

भारत इतिहास घडविण्यास उत्सुक
नवी दिल्ली : शानदार फॉर्मात असलेल्या विराट कोहलीचे नेतृत्व आणि नवे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या दांडगा अनुभव व मार्गदर्शनाखाली टीम इंडिया गुरुवारपासून वेस्ट इंडीजमध्ये खेळल्या जाणाऱ्या ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत अनोखा इतिहास नोंदवण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.
भारताची विदेशातील कामगिरी विशेष चांगली नाही; पण या मालिकेच्या निमित्ताने भारताला विंडीजमध्ये मालिका विजयाची हॅट््ट्रिक नोंदविण्याची संधी आहे. भारताने विंडीजमधील गेल्या २ दौऱ्यांमध्ये मालिका विजय साकारला आहे.
१९५३पासून भारताने विंडीजमध्ये आतापर्यंत एकूण ४५ कसोटी सामने खेळले असून, त्यांतील ५ जिंकले, १६ गमावले तर २४ सामने अनिर्णीत राहिले. एकूण विचार करता भारताने विंडीजविरुद्ध १९४८पासून आतापर्यंत ९० कसोटी सामने खेळले. त्यांत १६ सामने जिंकले, तर ३० सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला. ४४ सामने अनीर्णीत राहिले. भारत या मालिकेत ४ कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे भारताच्या खात्यावर एकूण ४९९ कसोटी सामन्यांची नोंद होईल.
भारताने १९५२-५३मध्ये प्रथमच विंडीजचा दौरा केला होता. भारताने विंडीजमध्ये एकूण १० मालिका खेळल्या आहेत. त्यांत ३ मालिका जिंकल्या, तर ७ मालिकांत पराभव स्वीकारावा लागला. यापूर्वीच्या दोन्ही मालिकांत भारताने विजय मिळविला असून, या वेळी मालिकेत सरशी साधून विजयाची हॅट््ट्रिक नोंदविण्याची संधी आहे.
भारताने त्यानंतर १९७५-७६मध्ये पोर्ट आॅफ स्पेनमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्यात ४०३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ४ गड्यांच्या मोबदल्यात ४०६ धावा फटकावून ऐतिहासिक विजय नोंदविला होता. २००६मध्ये किंग्स्टन येथील सबिना पार्कमध्ये भारताने चौथ्या व
अखेरच्या कसोटी सामन्यात ४९ धावांनी विजय मिळवून मालिकेत सरशी साधली होती.
२०११मध्ये भारताने सबिना पार्कमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात ६३ धावांनी मिळविलेला विजय मालिकेत निर्णायक ठरला. (वृत्तसंस्था)
>२००६ मध्ये टीम इंडियाने विंडीजचा ४ सामन्यांच्या मालिकेत १-० ने, तर २०११मध्ये ३ सामन्यांच्या मालिकेत १-०ने पराभव केला होता. यापूर्वी १९७१मध्ये अजित वाडेकरच्या नेतृत्वाखाली ५ सामन्यांच्या ऐतिहासिक
मालिकेत भारताने १-०ने विजय मिळविला होता.
२००६ च्या मालिकेत राहुल द्रविड भारतीय संघाचा कर्णधार होता, तर २०११मध्ये संघाचे नेतृत्व महेंद्रसिंह धोनीकडे होते. धोनीने आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली असून, कसोटी संघाचे नेतृत्व कोहली करीत आहे.
१९७५-७६
मध्ये भारताने याव्यतिरिक्त ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत आणि २००२मध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत प्रत्येकी १ सामना जिंकला होता.
१९७१ मध्ये ६ ते १० मार्च या कालावधीत पोर्ट आॅफ स्पेनमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ७ गडी राखून ऐतिहासिक विजय नोंदविला होता. या सामन्यात महान फलंदाज सुनील गावसकर यांनी पदार्पण केले होते. आॅफ स्पिनर श्रीनिवास व्यंकटराघवनने दुसऱ्या डावात ९५ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेऊन भारताच्या विजयाचा मार्ग प्रशस्त केला होता. या मालिकेत ४ कसोटी सामने अनिर्णीत संपले होते.