बरोबरी साधण्यास भारत उत्सुक
By Admin | Updated: October 4, 2015 23:50 IST2015-10-04T23:50:22+5:302015-10-04T23:50:22+5:30
गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे पहिल्या टी-२० सामन्यात पराभव स्वीकारणारा भारतीय संघ सोमवारी खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या लढतीत उणिवा दूर करण्यास प्रयत्नशील

बरोबरी साधण्यास भारत उत्सुक
कटक : गोलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीमुळे पहिल्या टी-२० सामन्यात पराभव स्वीकारणारा भारतीय संघ सोमवारी खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या लढतीत उणिवा दूर करण्यास प्रयत्नशील असून तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्यास उत्सुक आहे.
भारताची या मालिकेत सुरुवात निराशाजनक झाली. धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला सोमवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजय मिळवणे आवश्यक आहे. सलामी लढतीतील पराभवासाठी जबाबदार असल्यामुळे भारतीय गोलंदाजांवर दडपण आहे. मालिकेत १-० ने आघाडीवर असलेला पाहुणा दक्षिण आफ्रिका संघ मालिकेत विजयी आघाडी घेण्यास प्रयत्नशील आहे.
तीन महिन्यांच्या कालावधीनंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीवर संघाला पुन्हा एकदा विजयी मार्गावर आणण्याची जबाबदारी आहे. धर्मशालाच्या तुलनेत कटक आणि कोलकाता येथील परिस्थिती धोनी अॅण्ड कंपनीसाठी अनुकूल राहण्याची आशा आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे कटक येथील खेळपट्टी संथ राहण्याची शक्यता आहे.
उभय संघ ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये दाखल झाले. त्या वेळी कटकमध्ये वादळी पाऊस सुरू होता. त्यामुळे स्टेडियमला जलतरण तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. सोमवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीपूर्वी मैदानाची स्थिती चिंतेचा विषय आहे. हवामान खात्याने आगामी ४८ तासांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे लढतीमध्ये षटकांची कपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मालिकेच्या सलामी लढतीत रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिले शतक झळकावले, तर कोहलीने ४३ धावांची खेळी केली. रोहित व विराटच्या कामगिरीच्या जोरावर भारताने १९९ धावांची दमदार मजल मारली. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही सर्वोच्च धावसंख्या होती. फलंदाजांकडून यापेक्षा चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त करता येणार नाही. फलंदाजांच्या चमकदार कामगिरीवर गोलंदाजांनी पाणी फेरले. रविचंद्रन आश्विनचा अपवाद वगळता अन्य गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली.
डीव्हिलियर्सचा विचार करता तो जगातील कुठल्याही गोलंदाजाविरुद्ध धावा वसूल करण्यात सक्षम आहे. अचूक दिशा व टप्पा राखून गोलंदाजी केली तरच त्याच्यावर अंकुश राखता येऊ शकतो. धर्मशाला येथे भुवनेश्वर कुमार व एस. अरविंद यांना अचूक यॉर्कर टाकता आले नाहीत. भारताच्या फलंदाजीचा विचार करता रोहित व कोहली बाद झाल्यानंतर अन्य फलंदाजांना वेगाने धावा वसूल करता आल्या नाहीत. डेथ ओव्हर्समध्ये अधिक धावा वसूल करण्याचा भारताचा प्रयत्न राहील. धोनीची अंबाती रायुडूला पसंती आहे, पण गेल्या लढतीत त्याला खातेही उघडता आले नाही. पटेलच्या स्थानासाठी ज्याप्रमाणे मिश्रा योग्य पर्याय आहे त्याचप्रमाणे रायुडूच्या स्थानी अजिंक्य रहाणे उत्तम पर्याय
ठरू शकतो. धोनी अंतिम ११ खेळाडूंमध्ये कुणाला संधी देतो, याबाबत उत्सुकता आहे. (वृत्तसंस्था)
------------प्रतिस्पर्धी संघ
भारत :- महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायुडू, अक्षर पटेल, रविचंद्रन आश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, एस. अरविंद, अजिंक्य रहाणे, स्टुअर्ट बिन्नी, हरभजन सिंग आणि अमित मिश्रा.
दक्षिण आफ्रिका :- फाफ डू प्लेसिस (कर्णधार), हाशिम अमला, एबी डीव्हिलियर्स, जेपी ड्युमिनी, फरहान बेहारडीन, मिलर, ख्रिस मॉरिस, कॅगिसो रबादा, केली एबट, मर्चंट डी लांगे, इम्रान ताहिर, क्विंटन डीकॉक, एडी लेई, अॅल्बी मोर्केल आणि कयाया जोंडो.