PM Modi on Neeraj Chopra: नीरज चोप्राने शुक्रवारी दोहा डायमंड लीग २०२५ मध्ये ९० मीटरचा टप्पा ओलांडत इतिहास रचला. त्याला विजेतेपद मिळवता आले नाही, पण तरीही भालाफेक स्पर्धेत दुसरे स्थान मिळवून नीरजने इतिहास रचला. या कामगिरीबद्दल पंतप्रधाननरेंद्र मोदींनी नीरजचे खूप कौतुक केले. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पोस्टमध्ये नीरजच्या कठोर परिश्रमाचा आणि स्वयंशिस्तीचाही उल्लेख केला. दोहा डायमंड लीगमध्ये, नीरजने पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत तिसऱ्या प्रयत्नात ९०.२३ मीटरचा सर्वोत्तम फेक केली. जर्मनीच्या ज्युलियन वेबरने ९१.०६ मीटर फेकून पहिले स्थान पटकावले.
नीरजच्या या कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली. नीरजचे कौतुक करताना पंतप्रधान मोदींनी लिहिले, "ही एक उत्तम कामगिरी आहे! दोहा डायमंड लीग २०२५ मध्ये ९० मीटरचा टप्पा ओलांडल्याबद्दल आणि वैयक्तिक सर्वोत्तम फेक मिळवल्याबद्दल नीरज चोप्राचे अभिनंदन. हे त्याच्या अथक परिश्रमाचे, शिस्तबद्धतेचे आणि उत्कटतेचे फळ आहे. भारताला तुझा अभिमान आहे."
डायमंड लीगच्या एका टप्प्यात प्रथम स्थान मिळवणाऱ्या खेळाडूला ८ गुण मिळतात. तर दुसऱ्या क्रमांकासाठी ७ गुण, तिसऱ्या क्रमांकासाठी ६ गुण आणि चौथ्या क्रमांकासाठी ५ गुण दिले जातात. नीरज चोप्राला या सामन्यात ७ गुण मिळाले, तर वेबरला ८ गुण मिळाले. डायमंड लीग २०२५ चा समारोप २७ आणि २८ सप्टेंबर रोजी झुरिच येथे होणाऱ्या डायमंड लीग फायनलने होणार आहे. डायमंड लीग फायनलमधील विजेत्याला डायमंड ट्रॉफी मिळते. दोहा डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राला अँडरसन पीटर्स (ग्रेनाडा), जाकुब वडलेच (चेक प्रजासत्ताक), ज्युलियन वेबर, मॅक्स डेहनिंग (दोघेही जर्मनी), ज्युलियस येगो (केनिया), रॉडरिक डीन (जपान) सारख्या खेळाडूंचे आव्हान असणार आहे. पॅरिस ऑलिंपिक २०२४ सुवर्णपदक विजेता पाकिस्तानचा अर्शद नदीमने दोहा डायमंड लीगमध्ये भाग घेतलेला नाही.