पाकला धूळ चारत भारताने पटकावला टी-२० विश्वचषक
By Admin | Updated: February 12, 2017 16:10 IST2017-02-12T16:10:36+5:302017-02-12T16:10:36+5:30
दृष्टिहीनांच्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गतवेळच्या विजेत्या भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत टी-२० विश्वचषकावर नाव कोरलं आहे

पाकला धूळ चारत भारताने पटकावला टी-२० विश्वचषक
ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि. 12 - दृष्टिहीनांच्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गतवेळच्या विजेत्या भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत टी-२०विश्वचषकावर नाव कोरलं आहे. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर नऊ विकेट राखून दणदणीत विजय मिळवत भारतीय संघाने विजेतेपद राखले.
प्रथम फलंदाजी करताना पाक संघाने 197/9 धावांचा डोंगर उभा केला होता. 198 धावांचा पाठलाग करताना भारताने पहिल्या दहा षटकात बिनबाद 109 धावांकरत कडवे आव्हान दिले. अजय कुमार रेड्डी आणि प्रकाश जयरामय्या या सलामीवीरांनी भारताला आश्वासक सुरुवात करुन दिली. अजय रेड्डी 43 धावा काढून धावबाद झाला. मात्र तोपर्यंत भारतीय संघ विजयासमीप आला होता. संघाच्या 163 धावा झाल्या असताना रेड्डी माघारी परतला. पाकिस्तानने दिलेले 198 धावांचे आव्हान भारताने 18 व्या षटकात पार करत पाक संघाचा 9 विकेटने दारूण पराभव केला.
शुक्रवारी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात भारताने श्रीलंकेवर दहा विकेट्स राखून मात करत अंतिम सामन्यात धडक मारली होती. तर शनिवारच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात पाकिस्ताननं इंग्लंडचं आव्हान मोडून काढत भारतासमोर कडवं आव्हान उभे केलं होते. साखळी फेरीत एकही सामना न हरता पाकिस्तानने अंतिम फेरीत धडक मारली होती. साखळी सामन्यात पाक संघाने भारतावर विजय मिळवला होता. त्याचा वचपा काढत भारतीय संघाने टी-20 विश्वचषकावर नाव कोरलं आहे.