जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत भारताला तीन पदके
By Admin | Updated: August 31, 2015 23:59 IST2015-08-31T23:59:13+5:302015-08-31T23:59:13+5:30
पहिलवान मोनूने ४६ किलो फ्री स्टाईलमध्ये आज कांस्यपदक जिंकले. त्यामुळे भारताच्या नावावर जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत एक सुवर्ण

जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत भारताला तीन पदके
सराजिवो (बोस्निया) : पहिलवान मोनूने ४६ किलो फ्री स्टाईलमध्ये आज कांस्यपदक जिंकले. त्यामुळे भारताच्या नावावर जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक रौप्यसह तीन पदके झाली आहेत.
भारत पुरुषांच्या फ्री स्टाईल कुस्तीत ३७ गुणांसह पाचव्या स्थानी राहिला. त्याआधी अनिल (सुवर्ण) आणि अंकुश (रौप्य) यांनी पदके जिंकली होती. कास्यपदकाच्या प्लेआॅफ लढतीत आज मोनूने अझरबैजानच्या असगर मामादियेवला ४-२ आणि उझबेकिस्तानच्या रुस्तमाबेक जुराएवला २-१ असे पराभूत करीत उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत तो ग्रीसच्या पिलिदिस जॉर्जियोसकडून २-४ असा पराभूत झाला. कास्यपदकाच्या लढतीत त्याने बेलारूसच्या दमित्री यार्मप्लचिकचा ११-० असा धुव्वा उडवला.
कास्यपदक जिंकल्यानंतर मोनू म्हणाला, ‘उपांत्यपूर्व फेरीपर्यंत सर्व सामने जिंकल्यानंतर मला सुवर्णपदक जिंकण्याचा विश्वास होता; परंतु उपांत्य फेरीत २ गुणांनी पराभूत होणे निराशाजनक ठरले. मी कास्यपदकासाठीच्या एकतर्फी लढतीत विजय मिळवला. उपांत्य फेरीत पराभूत झाल्याने माझा आत्मविश्वास कमी झाला होता; परंतु प्रशिक्षकांनी जिंकण्यासाठी माझ्यात आत्मविश्वास निर्माण केला. त्यामुळे मी जिंकू शकलो. त्यामुळे मी त्यांचे आभार मानू इच्छितो.’ स्पर्धेच्या १०० किलो वजनी गटात भारताच्या नासिर हुसैन उपांत्य फेरीत पोहोचला; परंतु त्याला तुर्कीच्या याकूप येरलिकाया याच्याकडून १२-२ असा पराभव पत्करावा लागला. भारत अजून एका कास्यपदकापासून वंचित राहिला.