भारताला विजेतेपद राखण्याची संधी
By Admin | Updated: March 14, 2015 01:50 IST2015-03-14T01:50:33+5:302015-03-14T01:50:33+5:30
यंदाच्या वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत टीम इंडिया तुफान फॉर्ममध्ये असून, संघाची कामगिरी चांगली होत आहे. त्यामुळेच या कामगिरीत सातत्य राखल्यास भारताला विश्व

भारताला विजेतेपद राखण्याची संधी
रोहित नाईक, मुंबई
यंदाच्या वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत टीम इंडिया तुफान फॉर्ममध्ये असून, संघाची कामगिरी चांगली होत आहे. त्यामुळेच या कामगिरीत सातत्य राखल्यास भारताला विश्वविजेतेपद राखण्याची चांगली संधी असेल, असे भारताचे माजी यष्टीरक्षक व माजी निवड समिती अध्यक्ष किरण मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
नुकताच मुंबईतील जय हिंद कॉलेज येथे चंद्रेश नारायन लिखित ‘वर्ल्डकप हीरोज’ या पुस्तकाचे किरण मोरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या वेळी मोरे यांनी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे कौतुक करताना सांगितले, की धोनीने स्पर्धेत पुन्हा एकदा आपले कल्पक नेतृत्व सिद्ध केले आहे. तो खेळाडूंवर पूर्ण विश्वास दाखवतो व त्यामुळेच संघाची कामगिरी चांगली होत आहे. शिवाय या स्पर्धेतून मोहंमद शामीने सर्वांनाच चकित केले आहे. तसेच शिखर धवन आणि विराट कोहली यांचा फॉर्मदेखील संघासाठी महत्त्वाचा ठरतोय, असेही मोरे यांनी सांगितले.
डिसेंबर २०१४ पासून भारतीय संघ आॅस्टे्रलियामध्ये असून, या काळात टीम इंडियाला कसोटी व एकदिवसीय स्पर्धेत एकही विजय मिळवता आला नव्हता. मात्र यानंतर टीम इंडियाने सर्वांनाच झटका देताना सलग विजयांची मालिका लावली. या विषयी मोरे म्हणाले, की निवडकर्त्यांनी आणि कर्णधाराने दाखवलेला विश्वास युवा खेळाडूंनी सार्थ ठरवला. या खेळाडूंनी संघाला गरज असताना चमकदार कामगिरी केली. एकाच वेळी सर्व खेळाडू फॉर्ममध्ये आल्याने संघाची विजयी घोडदौड सुरू आहे.
वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेच्या कुमार संगकाराविषयी मोरे म्हणाले, की संगकारा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो क्रिकेटच्या कोणत्याही फॉर्ममध्ये खेळू शकतो. कसोटीमध्ये त्याने ११ वेळा २००हून अधिक धावा फटकावण्याची किमया केली असून, तो महान खेळाडू आहे.