भारत अंतिम फेरीत
By Admin | Updated: January 1, 2016 05:40 IST2016-01-01T01:01:16+5:302016-01-01T05:40:45+5:30
जबरदस्त सूर गवसलेल्या जेजे लालपेखलुआ याच्या दोन गोलच्या बळावर भारताने उपांत्य फेरीत मालदीवचा ३-२ असा धुव्वा उडवताना आशियाई फुटबॉल चॅम्पियनशीपमध्ये विक्रमी दहाव्यांदा

भारत अंतिम फेरीत
तिरुवनंतपुरम : जबरदस्त सूर गवसलेल्या जेजे लालपेखलुआ याच्या दोन गोलच्या बळावर भारताने उपांत्य फेरीत मालदीवचा ३-२ असा धुव्वा उडवताना आशियाई फुटबॉल चॅम्पियनशीपमध्ये विक्रमी दहाव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली.
इंडियन सुपर लीगमध्ये प्रभावी कामगिरी केल्यानंतर जेजेने त्याचा फॉर्म कायम ठेवताना ३४ व्या आणि ६६ व्या मिनिटाला गोल केला. कर्णधार सुनील छेत्रीने २५ व्या मिनिटाला गोल करीत भारताला आघाडी मिळवून दिली होती. मालदीवकडून अहमद नाशी याने ७४ व्या आणि अमदान अली याने ७५ व्या मिनिटाला गोल केले.
विक्रमी सातवे सॅफचे विजेतेपद पटकाविण्याच्या वज्रनिर्धाराने खेळणाऱ्या भारताने उपांत्य फेरीत आक्रमक सुरुवात केली. सुरुवातीच्या काही क्षणांतच छेत्रीने अर्नब
मंडलकडे पास दिला आणि जेजेने पायात चेंडू गोलपोस्टमध्ये ढकलला; परंतु त्याला पंचांनी त्याला आॅफसाइड ठरवले.
२ गोलने आघाडी मिळाल्यानंतर भारतीय प्रशिक्षक स्टीन कोंस्टेंटाईन यांनी छेत्रीला बोलावून घेताना ७४ व्या मिनिटाला छांगटे लालियांजुआला याला मैदानात उतरवले. एका मिनिटानंतर अली अमदान याने गोल करीत मालदीवच्या आशा जिवंत ठेवल्या; परंतु भारतीय डिफेंडरने त्यांच्या आशेवर पाणी फेरले. भारताचा सामना उद्या श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजयी ठरणाऱ्या संघाविरुद्ध होणार आहे. (वृत्तसंस्था)
22व्या मिनिटाला होलिचरन नरजारीने फ्लिक मालदीवच्या डिफेंडरने वाचवला. तथापि, हा अडथळा लवकरच मोडीत काढताना देशाकडून सर्वाधिक गोल करणाऱ्या छेत्रीने नरजारीच्या क्रॉसवर गोल करीत भारताला आघाडी मिळवून दिली. भारताला लगेच गोल करण्याची संधी मिळाली होती; परंतु जेजेचा हा प्रयत्न मालदीवच्या डिफेंडरने निष्फळ ठरवला.
160 व्या स्थानी रँकिंगमध्ये असणाऱ्या मालदीवसाठी नाशिदने पहिला गोल केला. अश्फाकच्या चेंडूवर इमाजने दिलेल्या पासवर नाशिदने हा गोल केला. भारतासाठी तिसरा गोल जेजे याने केला. त्याचा सूत्रधारदेखील छेत्री होता. छेत्रीकडून चेंडू घेत जेजेने मालदीवच्या डिफेंडरला चकवताना गोल केला.