भारताला स्पेनचे कडवे आव्हान
By Admin | Updated: August 9, 2015 22:40 IST2015-08-09T22:40:57+5:302015-08-09T22:40:57+5:30
फ्रान्सविरुद्ध सहज विजय मिळवणारा भारतीय पुरुष हॉकी संघाला येथे सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेत स्पेनच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे

भारताला स्पेनचे कडवे आव्हान
सेंट कुगाट : फ्रान्सविरुद्ध सहज विजय मिळवणारा भारतीय पुरुष हॉकी संघाला येथे सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेत स्पेनच्या कडव्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. नेदरलँडमध्ये २०१४ च्या विश्वचषकामध्ये दोन्ही संघांत संघर्षपूर्ण लढत पाहायला मिळाली होती, तेव्हा हा सामना १-१ असा अनिर्णीत राहिला होता. याआधी २०१३ मध्ये विश्व लीग सेमीफायनल्समध्ये भारताला स्पेनविरुद्ध २-४ असा पराभव पत्करावा लागला होता.
स्पेनविरुद्ध होणाऱ्या सामन्याआधी मुख्य प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स म्हणाले, की फ्रान्सविरुद्ध मिळवलेल्या विजयामुळे संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. मी खेळाडूंच्या कामगिरीत खूप सुधारणा पाहिली आहे आणि त्यांनी गेल्या सामन्यातील चुकांपासून धडा घेऊन आपल्या व्यूहरचनेवर खूप मेहनत घेतली आहे. डिफेन्स आमची मजबूत बाजू आहे आणि उद्यादेखील विजयाने प्रारंभ करू अशी मला आशा वाटते.
कर्णधार सरदारसिंह म्हणाला, की आमचे लक्ष्य सुरुवातीपासूनच स्पेनला दबावात आणणे हे आहे. त्याचप्रमाणे सर्वच विभागांत मेहनत घ्यायची आहे. ज्याची सुरुवात डिफेन्स, चेंडू आपल्या ताब्यात ठेवणे आणि आक्रमक व्यूहरचना याचा त्यात समावेश आहे. विजयी मालिका कायम ठेवू, अशी आशा वाटते. भारत एचआयएच रँकिंगमध्ये आठव्या, तर स्पेन दहाव्या स्थानी आहे. (वृत्तसंस्था)