इंग्लंडविरुद्ध विजय मिळविण्यास भारत उत्सुक

By Admin | Updated: June 2, 2014 06:52 IST2014-06-02T06:52:25+5:302014-06-02T06:52:25+5:30

विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताला उद्या, सोमवारी साखळी फेरीतील दुसर्‍या लढतीत इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

India eager to win against England | इंग्लंडविरुद्ध विजय मिळविण्यास भारत उत्सुक

इंग्लंडविरुद्ध विजय मिळविण्यास भारत उत्सुक

हेग : विश्वचषक हॉकी स्पर्धेत भारताला उद्या, सोमवारी साखळी फेरीतील दुसर्‍या लढतीत इंग्लंडच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. सलामी लढतीत बेल्जियमविरुद्ध पराभव स्वीकारणारा भारतीय संघ उद्या खेळल्या जाणार्‍या लढतीत पूर्ण गुण वसूल करण्यासाठी प्रयत्नशील आहे. काल, शनिवारी खेळल्या गेलेल्या लढतीत अखेरच्या मिनिटाला गोल खावा लागल्यामुळे भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला. भारतीय संघाला उद्या खेळल्या जाणार्‍या लढतीच्या निमित्ताने नवी दिल्लीमध्ये विश्व लीग फायनल्समध्ये इंग्लंडविरुद्ध ०-२ गोलफरकाने पत्कराव्या लागलेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. गेल्या वर्षी हॉकी इंडिया लीगमध्ये विक्रमी ७३ हजार डॉलर्स रकमेला करारबद्ध झालेल्या अ‍ॅश्ले जॅक्सनच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघ आक्रमक आहे; पण प्रतिस्पर्धी संघ बचावातील कमकुवतपणाचा लाभ घेण्यात तरबेज आहे. भारतीय कोचिंग स्टाफ सध्या बचावातील उणिवा दूर करण्यास प्रयत्नशील आहे. भारतीय संघाने सामना संपायला केवळ १५ सेकंदांचा वेळ शिल्लक असताना बेल्जियमकडून गोल स्वीकारला. इंग्लंडच्या युरोपियन व बचावात्मक शैलीविरुद्ध भारतीय संघ कुठली रणनीती आखतो, याचे उत्तर उद्या सामन्यानंतर स्पष्ट होईल. या लढतीच्या निमित्ताने भारतीय संघाचे नवे प्रशिक्षक टेरी वाल्श व तांत्रिक संचालक रोलेंट ओल्टमेन्स यांची कसोटी आहे. भारतीय संघ अद्याप युरोपियन कप उपविजेत्या बेल्जियमविरुद्ध अखेरच्या क्षणी पत्कराव्या लागलेल्या पराभवाच्या धक्क्यातून सावरलेला नाही. बेल्जियम संघाला ‘अ’ गटात आॅस्ट्रेलियापाठोपाठ उपांत्य फेरीचा दावेदार मानले जात आहे. इंग्लंडला सलामी लढतीत स्पेनविरुद्ध १-१ ने बरोबरीवर समाधान मानावे लागले. सलामी लढतीत गुणांचे खाते उघडण्यात भारतीय संघ अपयशी ठरल्यामुळे प्रशिक्षक वॉल्श निराश झाले आहेत; पण या लढतीतील कामगिरीमुळे भारतीय संघाचे मनोधैर्य उंचावण्यास मदत झाली. इंग्लंडविरुद्धच्या लढतीत मात्र भारतीय संघाला चुकांची पुनरावृत्ती टाळावी लागेल. ते म्हणाले, स्पेनविरुद्धच्या लढतीत पूर्ण गुण वसूल करता न आल्यामुळे इंग्लंडचे प्रशिक्षक बॉबी क्रचले निराश आहेत. क्रचले म्हणाले, ‘आम्ही समाधानकारक सुरुवात केली असून, भारताविरुद्धच्या लढतीत वर्चस्व गाजविण्यास उत्सुक आहोत.’ भारतीय संघ विश्व मानांकनामध्ये आठव्या स्थानावर आहे, तर इंग्लंड संघ चौथ्या स्थानी विराजमान आहे. भारतीय बचावफळीपुढे इंग्लंडच्या स्ट्रायकर्सला रोखण्याचे आव्हान आहे. २०१० मध्ये नवी दिल्ली येथे खेळल्या गेलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: India eager to win against England

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.