शूटआउटमध्ये रशियाकडून भारताचा पराभव...
By Admin | Updated: August 8, 2016 03:41 IST2016-08-08T03:41:18+5:302016-08-08T03:41:18+5:30
आॅलिम्पिकमध्ये भारतीय महिला तिरंदाजी संघ रिकर्व्ह प्रकारात अटीतटीच्या उपांत्यपूर्व फेरीत रशियाकडून ४-५ अशा फरकाने पराभूत झाल्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

शूटआउटमध्ये रशियाकडून भारताचा पराभव...
ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. ८ : आॅलिम्पिकमध्ये भारतीय महिला तिरंदाजी संघ रिकर्व्ह प्रकारात अटीतटीच्या उपांत्यपूर्व फेरीत रशियाकडून ४-५ अशा फरकाने पराभूत झाल्यामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. ४-४ अशी बरोबरी असताना निर्णायक सेटमध्ये दोन्ही संघांच्या खेळाडूंनी आपले कसब पणाला लावले होते. दीपिकाकुमारी, लक्ष्मीरानी माझी, बोम्बायलादेवी या तिघींकडून यावेळी सरस कामगिरी अपेक्षित होती.
मात्र, निर्णायक क्षणी त्या दबावाचा सामना करण्यात अपयशी ठरल्याने भारताला स्पर्धेबाहेर व्हावे लागले. अखेरच्या क्षणी रशियन तिरंदाजाने ९ तर भारतीय तिरंदाजाने ८ गुण नोंदवताच या सेटचा निकाल २५-२३ असा रशियाच्या बाजूने गेला आणि भारत पराभूत झाला. ट्युनिया डॉशीजोर्झी, सेनिया पेरोवा आणि इना स्टेपनोवा यांचा समावेश असलेल्या रशियन संघाने ही लढत ५५-४८, ५२-५३, ५०-५३, ५५-५४,
२५-२३ अशी जिंकली.
तत्पूर्वी, कोलंबियाला ५-३ असे हरवून भारताने उपांत्यपूर्व फेरी गाठली. दीपिकाकुमारी, लक्ष्मीरानी माझी, बोम्बायलादेवी सर्वश्रेष्ठ कामगिरी करण्यात अपयशी ठरल्या असल्या तरी कोलंबियावर सरशी साधण्यात त्या यशस्वी ठरल्या. पहिल्या तीन सेट नंतर दोन्ही संघ ३-३ असे बरोबरीत होते, शेवटच्या फेरीत भारताच्या ५२ गुणांना मागे टाकण्यासाठी कोलंबियाला २८ गुणांची आवश्यकता होती, परंतु त्यांच्या कॅरोलिन एगुईरे हिने मोठी चूक केली.