पाकला नमवत भारताने पटकावले हॉकीमधील सुवर्णपदक

By Admin | Updated: October 2, 2014 18:01 IST2014-10-02T17:23:40+5:302014-10-02T18:01:27+5:30

पाकिस्तानला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४ - २ ने नमवत भारताने आशियाई स्पर्धेत हॉकीमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे.

India defeated Pakistan by winning the gold medal in Hockey | पाकला नमवत भारताने पटकावले हॉकीमधील सुवर्णपदक

पाकला नमवत भारताने पटकावले हॉकीमधील सुवर्णपदक

ऑनलाइन लोकमत 

इंचियोन, दि. २ -  पाकिस्तानला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४ - २ ने नमवत भारताने आशियाई स्पर्धेत हॉकीमध्ये सुवर्ण पदक पटकावले आहे. आशियाई स्पर्धेत तब्बल १६ वर्षांनी भारताने हॉकीमध्ये सुवर्णपदक पटकावले असून या विजयासह भारताचे २०१६ मध्ये रिओ येथे होणा-या ऑलिंपिकचे तिकीटही कन्फर्म झाले आहे. 
आशियाई स्पर्धेत गुरुवारी हॉकीमध्ये भारतीय संघांची पाकिस्तानसोबत अंतिम लढत होती. आशियाई स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. त्यामुळे अंतिम सामन्यात भारत या पराभवाचा वचपा काढणार की पुन्हा पाकिस्तान विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. सामन्याच्या सुरुवातीलाच पाकिस्तानने पहिला गोल करुन भारतीय संघावर दबाव आणला. मात्र सरदार सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणा-या भारतीय संघाने हा दबाव झुगारुन पाकला चोख प्रत्युत्तर दिले. पहिल्याच हाफमध्ये भारतानेही गोल केला व सामन्यात बरोबरी साधली. यानंतर दुस-या हाफमध्ये दोन्ही संघाने गोल करण्यासाठी अथक प्रयत्न केले. मात्र यात त्यांना अपयश आले. सामना १ -१ ने बरोबरीत संपल्यावर पेनल्टी शूट आऊटद्वारे सामन्याचा निकाल लागला. 
पेनल्टी शूट आऊटमध्ये भारताचा गोलकिपर श्रीजेशची भक्कम  तटबंदी मोडून काढण्यात पाकिस्तानच्या हॉकीपटूंना अपयश आले व भारताने पेनल्टी शूट आऊटमध्ये ४ -२ असा विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले. भारताने तब्बल ३२ वर्षांनंतर आशियाई स्पर्धेच्या फायनलमध्ये पाकला नमवले आहे. यापूर्वी १९८२ मध्ये आशियाई स्पर्धेतील फायनलमध्ये पाकने भारताचा ७ -१ असा दारुण पराभव केला होता. 
----------
रिलेमध्ये भारताच्या महिला संघाला सुवर्णपदक
४ बाय ४०० मीटरच्या रिलेमध्ये भारताच्या महिला संघाने सुवर्ण पदक पटकावले. गुरुवारी दोन सुवर्णपदक मिळाल्याने पदक तालिकेत भारत ११ व्या स्थानावरुन ९ व्या स्थानावर आला आहे. भारताच्या खात्यामध्ये ९ सुवर्ण, ९ रौप्य व ३५ कांस्य पदक आहेत. 

Web Title: India defeated Pakistan by winning the gold medal in Hockey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.