भारत गुआमविरुद्ध २-१ ने पराभूत
By Admin | Updated: June 17, 2015 02:01 IST2015-06-17T02:01:39+5:302015-06-17T02:01:39+5:30
कर्णधार सुनील छेत्रीने ५० वा आंतरराष्ट्रीय गोल नोंदवला असला, तरी २०१८ च्या फिफा फुटबॉल विश्वकप प्री-क्वालिफायर

भारत गुआमविरुद्ध २-१ ने पराभूत
गुआम : कर्णधार सुनील छेत्रीने ५० वा आंतरराष्ट्रीय गोल नोंदवला असला, तरी २०१८ च्या फिफा फुटबॉल विश्वकप प्री-क्वालिफायर लढतीत भारतीय संघाला जागतिक क्रमवारीत १७४ व्या स्थानावर असलेल्या गुआम संघाविरुद्ध १-२ ने पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे भारताच्या विश्वकप स्पर्धेसाठी पात्र ठरण्याच्या आशेला धक्का बसला आहे.
येथील जीएफए राष्ट्रीय फुटबॉल स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या ‘ड’ गटाच्या लढतीत भारताने चांगली सुरुवात केली; पण ३६व्या
मिनिटाला यजमान संघातर्फे ब्रॅन्डन मॅकडोनल्डने शानदार गोल नोंदवीत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. गेल्या आठवड्यात ओमानविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर मानांकनामध्ये १४१ व्या स्थानावर असलेल्या भारतीय संघासाठी हा सलग दुसरा पराभव आहे. यापूर्वी उभय संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या लढतीत भारताने ४-० ने विजय मिळवला होता.
सामन्यात मध्यंतरापर्यंत स्कोअर १-० असा होता. भारत बरोबरी साधण्यासाठी प्रयत्नशील होता; पण प्रतिस्पर्धी संघाच्या ट्रॅव्हिस निकलॉने ६२ व्या मिनिटाला गोल नोंदवीत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. शहनाज सिंगने खाते उघडण्याचा प्रयत्न केला; पण त्याला यश आले नाही.
भारतीय कर्णधार छेत्रीने इंज्युरी टाइममध्ये संघातर्फे पहिला गोल नोंदविला. त्यानंतर गुआम संघाने आघाडी कायम राखत विजयावर शिक्कामोर्तब केले. छेत्रीचा हा ५० वा आंतरराष्ट्रीय गोल ठरला. त्याने या लढतीत वैयक्तिक विक्रम नोंदवला असला तरी संघाला मात्र त्याचा लाभ झाला नाही. भारत व तुर्कमेनिस्तान संघांविरुद्ध सलग दोन विजय मिळविणाऱ्या गुआम संघाने राऊंड-२ च्या ‘ड’ गटात गुणतालिकेत अव्वल स्थानावर झेप घेतली. गुआम संघाचा हा विश्वकप पात्रता स्पर्धेतील केवळ दुसरा विजय आहे. यापूर्वी त्यांनी ‘ड’ गटात तुर्कमेनिस्तानविरुद्ध १-० ने विजय मिळवला होता. (वृत्तसंस्था)
५० गोल नोंदविणारा पहिला भारतीय
तामुनिंग : भारतीय फुटबॉल संघाला विश्वकप पात्रता स्पर्धेत गट साखळी सामन्यात गुआमविरुद्ध १-२ ने पराभव स्वीकारावा लागला असला, तरी कर्णधार सुनील छेत्रीने आपल्या कारकिर्दीत ५० वा आंतरराष्ट्रीय गोल नोंदवण्याची कामगिरी केली.
छेत्रीने आज सामना संपायला काही क्षणांचा अवधी शिल्लक असताना कारकिर्दीतील ५० वा गोल नोंदवला. भारतातर्फे ५० गोल नोंदवणारा तो पहिला खेळाडू ठरला. माजी कर्णधार बायचुंग भुतियाने १०७ सामन्यांत ४२ गोल नोंदवले असून, तो या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तिसऱ्या स्थानावर असलेल्या आय. एम. विजयनने ७९ सामन्यांत ४० गोल नोंदवले आहेत. भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागल्यामुळे छेत्रीच्या या कामगिरीला विशेष महत्त्व देण्यात आलेले नाही. भारताचा या लढतीत विजय निश्चित मानला जात होता, पण संघाची कामगिरी निराशाजनक ठरली.
खेळाडंूना फुटबॉलचे ज्ञान कमी
-गुआमविरुद्धच्या लढतीत भारतीय खेळाडंूना फुटबॉलचे ज्ञान कमी असल्यासारखे
जाणवले. त्यामुळे महत्त्वपूर्ण क्षणी संघाला
व खेळाडूंना नुकसान झाले. खेळाडूंच्या
आजच्या कामगिरीवर मी निराश झालो असल्याचे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेनटाईन
यांनी म्हटले आहे.