भारत-द. आफ्रिका सामना रोखण्यास न्यायालयाचा नकार
By Admin | Updated: October 12, 2015 23:55 IST2015-10-12T23:55:39+5:302015-10-12T23:55:39+5:30
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्थानिक होळकर स्टेडियममध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील १४ आॅक्टोबर रोजी होणारा एकदिवसीय सामना रोखण्याची विनंती अमान्य केली.

भारत-द. आफ्रिका सामना रोखण्यास न्यायालयाचा नकार
इंदौर : मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्थानिक होळकर स्टेडियममध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील १४ आॅक्टोबर रोजी होणारा एकदिवसीय सामना रोखण्याची विनंती अमान्य केली.
उच्च न्यायालयाच्या इंदौर पीठाचे न्यायाधीश पी. के. जायस्वाल आणि न्या. डी. के. पालीवाल यांनी एका जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान संबंधित बाजूंचा युक्तिवाद ऐकला आणि त्यानंतर याचिकाकर्त्याची सामना रोखण्याची विनंती अमान्य केली.
अशाप्रकारच्या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास मान्यता दिली जाऊ शकत नाही. कारण त्याच्याशी निगडित सर्व पावले हे कायदेशीर उचलले गेले आहेत, असे पीठाने म्हटले. शहरातील दोन वकिलांनी भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्याविषयी जनहित याचिका दाखल करीत उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता.
हायकोर्ट बार असोसिएशनचे सचिव अनिल ओझा यांनी याचिकाकर्त्यांची बाजू मांडताना न्यायालयात सामन्यातील तिकिटांच्या विक्रीत गोंधळ आणि काळाबाजार यामुळे सर्वसाधारण क्रिकेट रसिक तिकीट खरेदीपासून वंचित राहत असल्याचा आरोप केला होता.
राज्य सरकारने मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेला (एमपीसीए) या तिकिटांच्या विक्रीवर मनोरंजन करात सूट दिली आहे. तसे पाहता एमपीसीए ही संघटना जनकल्याणकारी संघटना नाही आणि या तिकीट विक्रीतून त्यांना व्यावसायिक फायदा होत असल्याचा युक्तिवादही ओझा यांनी केला.