पहिल्याच सराव सामन्यात भारतीयांना धक्का, स्पेनविरुध्द १-४ असा पराभव
By Admin | Updated: July 28, 2016 20:23 IST2016-07-28T20:23:30+5:302016-07-28T20:23:30+5:30
रिओ आॅलिम्पिकच्या तयारीसाठी स्पेनमध्ये सराव सामने खेळण्यास गेलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाला पहिल्याच सामन्यात दारुण पराभवास सामोरे जावे लागले.

पहिल्याच सराव सामन्यात भारतीयांना धक्का, स्पेनविरुध्द १-४ असा पराभव
ऑनलाइन लोकमत
माद्रिद, दि. २८ : रिओ आॅलिम्पिकच्या तयारीसाठी स्पेनमध्ये सराव सामने खेळण्यास गेलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाला पहिल्याच सामन्यात दारुण पराभवास सामोरे जावे लागले. एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारताला यजमान स्पेनविरुध्द १-४ असा पराभव पत्करावा लागला.
५ आॅगस्टपासून सुरु होणाऱ्या आॅलिम्पिकमध्ये पदकाचे प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाला पहिल्याच सराव सामन्यात मोठा पराभव पत्करावा लागला. यजमान स्पेनने आक्रमक सुरुवात करताना भारतीयांना दबावाखाली ठेवले. जावी लियोनार्ट याने दहाव्याच मिनिटाला वेगवान गोल नोंदवताना स्पेनला १-० असे आघाडीवर नेले. यानंतर भारतीयांनी देखील जोरदार प्रत्युत्तर देताना पुनरागमनाचे प्रयत्न केले आणि त्यात त्यांना यशही आले. रुपिंदर पाल सिंगने २१व्या मिनिटाला महत्त्वपूर्ण गोल करताना भारताला १-१ असे बरोबरीत नेले. यावेळी भारत पुनरागमन करणार असे दिसत होते.
परंतु; दुसऱ्या क्वार्टरच्या अखेरच्या मिनिटाला पाऊ क्वेपदाने केलेल्या गोलच्या जोरावर स्पेनने २-१ अशी आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत यजमानांनी हीच आघाडी कायम राखून सामन्यावर वर्चस्व राखले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये मात्र यजमानांनी तुफानी खेळ करताना भारताच्या आव्हानातली हवाच काढली. दोन गोल नोंदवताना स्पेनने दणदणीत विजय मिळवला.
पुन्हा एकदा लियोनार्टने आपली चमक दाखवताना ३१व्या मिनिटाला संघाचा तिसरा गोल करुन स्पेनला ३-१ अशी आघाडी मिळवून दिली. तर पाऊने देखील वैयक्तिक दुसरा गोल नोंदवून स्पेनच्या विजयावर ४-१ असे शिक्कामोर्तब केले. स्पेनच्या या धडाकेबाज खेळापुढे भारतीय प्रचंड दबावाखाली आले. त्याचवेळी स्पेनच्या बचावपटूंनी भारतीय आक्रमकांना रोखताना त्यांना आणखी दबावाखाली आणले. यानंतर पुर्णपणे बचावात्मक भूमिका घेत भारताने स्पेनला चौथ्या क्वार्टरमध्ये गोल करण्यापासून रोखले, मात्र त्यांनाही गोल करण्यात यश आले नाही.