भारताचा न्यूझीलंडवर ३-१ ने विजय
By Admin | Updated: October 8, 2015 04:18 IST2015-10-08T04:18:46+5:302015-10-08T04:18:46+5:30
भारताच्या पुरुष हॉकी संघाने जोरदार मुसंडी मारताना यजमान न्यूझीलंडला चार सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बुधवारी ३-१ ने पराभूत करीत मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे.

भारताचा न्यूझीलंडवर ३-१ ने विजय
नवी दिल्ली : भारताच्या पुरुष हॉकी संघाने जोरदार मुसंडी मारताना यजमान न्यूझीलंडला चार सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बुधवारी ३-१ ने पराभूत करीत मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे.
पहिल्या सामन्यात ०-२ ने पराभव पत्करणाऱ्या भारतीय संघाने या सामन्यात आक्रमक सुरुवात करीत वर्चस्वपूर्ण खेळ केला. दहाव्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळाला; पण भारताने याचा लाभ घेतला नव्हता. पण १३व्या मिनिटाला पुन्हा पेनल्टीची संधी मिळताच रमणदीपने रिबाऊंडवर गोल नोंदवत आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या क्वाटर्रमध्येही भारतीय खेळाडूंनी वारंवार हल्ले केले. धर्मवीरचे शानदार मूव्ह प्रतिस्पर्धी गोलकिपरने थोपवून लावताच आघाडी दुप्पट करण्यात अपयश आले. दुसरीकडे न्यूझीलंडनेदेखील मुसंडी मारली; पण त्यांना भारतीय बचावफळी भेदण्यात अपयश आले. न्यूझीलंडला २३ व्या मिनिटाला मिळालेली पेनल्टी कॉर्नरची संधी गोलकिपर श्रीधर याने निष्फळ ठरविली.
मध्यंतरानंतर गुरुजिंदरला आघाडी दुप्पट करण्याची संधी होती; पण त्याने मारलेला शॉट गोलजाळीबाहेर गेला. न्यूझीलंडलादेखील ३५ व्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी कॉर्नर श्रीजेशने निष्प्रभ ठरविला. न्यूझीलंडने ४५ व्या मिनिटाला दडपण आणताच रसले याने पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत बरोबरी साधून दिली. यानंतर भारताने जलद हल्ले करताच ५२ व्या मिनिटाला लाभ झाला. मनप्रितच्या सुरेख पासवर ललित उपाध्याय याने गोल नोंदविताच २-१ अशी आघाडी झाली. सामन्याच्या अखेरच्या मिनिटाला निक्किन थिमय्याने गोल नोंदविताच ३-१ अशा आघाडीसह भारताचा विजय निश्चित झाला. उभय संघात तिसरा कसोटी सामना ख्राईस्टचर्च येथे ९ आॅक्टोबर रोजी खेळला जाईल. (वृत्तसंस्था)