भारताची न्यूझीलंड ‘अ’ संघावर २-१ ने मात
By Admin | Updated: October 4, 2015 04:08 IST2015-10-04T04:08:23+5:302015-10-04T04:08:23+5:30
अनुभवी खेळाडू एस. उथप्पाच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारतीय पुरुष हॉकी संघाने कामगिरीत सातत्य राखताना शनिवारी न्यूझीलंड ‘अ’ संघाचा २-१ ने पराभव केला

भारताची न्यूझीलंड ‘अ’ संघावर २-१ ने मात
आॅकलंड : अनुभवी खेळाडू एस. उथप्पाच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारतीय पुरुष हॉकी संघाने कामगिरीत सातत्य राखताना शनिवारी न्यूझीलंड ‘अ’ संघाचा २-१ ने पराभव केला आणि या दौऱ्यात सलग दुसरा विजय नोंदवला.
न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाच्या विजयात उथप्पाची कामगिरी पुन्हा एकदा उल्लेखनीय ठरली. सामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये उभय संघांनी एकमेकांच्या गोलक्षेत्रात वारंवार मुसंडी मारली. पहिल्या लढतीत विजय मिळविल्यामुळे मनोधैर्य उंचावलेल्या भारतीय संघातर्फे उथप्पाने पाचव्या मिनिटाला गोल नोंदवीत संघाचे खाते उघडले.
एस. व्ही. सुनीलने प्रतिस्पर्धी संघाच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारताना निकिन तिमैयाकडे चेंडू सोपवला. तिमैयाने उथप्पाला पास दिला. त्यावर उथप्पाने चेंडूंना गोलजाळ्याचा मार्ग दाखवीत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. सुरुवातीला झालेल्या या गोलमुळे प्रतिस्पर्धी संघावर दडपण आले. भारतीय संघाने यजमान संघाच्या बचाव फळीला व्यस्त ठेवले. पहिल्या क्वार्टरमध्ये त्यानंतर गोल नोंदवल्या गेला नाही, पण भारताने आघाडी कायम राखण्यात यश मिळवले. दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारताने आश्वासक सुरुवात केली आणि न्यूझीलंड ‘अ’ संघाच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये प्रतिस्पर्धी संघाने भारताला गोल नोंदविण्याची संधी दिली नाही. भारतीय बचाव फळीनेही प्रतिस्पर्धी संघाच्या आघाडीच्या फळीला रोखण्यात यश मिळवले. मध्यंतरापर्यंत भारतीय संघाने १-० अशी आघाडी कायम राखली होती.
सामन्याचा तिसरा क्वार्टर रंगतदार ठरला. भारताने या क्वार्टरमध्ये आणखी एक गोल नोंदवला. उथप्पाने अनुभवाचा लाभ घेत सामन्याच्या ३४ व्या मिनिटाला गोल नोंदवीत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. उथप्पाने न्यूझीलंडच्या गोलक्षेत्रात मुसंडी मारताना बचावफळी व गोलकिपरला गुंगारा देत मैदानी गोल नोंदवला.
तिसरा क्वार्टर संपायला काही सेकंदांचा अवधी शिल्लक असताना भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला; पण त्यावर गोल नोंदविता आला नाही. सामन्याच्या चौथ्या क्वार्टरमध्ये न्यूझीलंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला; पण भारतीय संघाचा अनुभवी गोलरक्षक व उपकर्णधार पी. आर. श्रीजेशने उत्कृष्ट बचाव करून प्रतिस्पर्धी संघाचे आक्रमण परतवून लावले. ५७व्या मिनिटाला यजमान संघातर्फे स्टीफन जेनेसने मैदानी गोल नोंदवून पिछाडी १-२ने कमी केली. या गोलमुळे भारतीय संघावर दडपण आले; पण त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला गोल नोंदविण्याची संधी दिली नाही. भारतीय संघाची तिसरी लढत न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघांविरुद्ध
६ आॅक्टोबर रोजी नेल्समध्ये
खेळली जाईल. (वृत्तसंस्था)