भारताची इटलीवर मात

By Admin | Updated: July 3, 2015 04:35 IST2015-07-03T04:35:20+5:302015-07-03T04:35:20+5:30

भारताने हॉकी विश्व लीग सेमीफायनलच्या क्लासिफिकेशन लढतीत आज कमी रँकिंग असणाऱ्या इटली संघाला शूटआऊटमध्ये ५-४ असे पराभूत करताना आॅलिम्पिकमध्ये आपले स्थान

India beat Italy | भारताची इटलीवर मात

भारताची इटलीवर मात

महिला हॉकी विश्व लीग : आॅलिम्पिकच्या आशा जिवंत

एंटवर्प : भारताने हॉकी विश्व लीग सेमीफायनलच्या क्लासिफिकेशन लढतीत आज कमी रँकिंग असणाऱ्या इटली संघाला शूटआऊटमध्ये ५-४ असे पराभूत करताना आॅलिम्पिकमध्ये आपले स्थान बनविण्यच्या आशा जिवंत ठेवल्या.
जागतिक क्रमवारीत १३ व्या मानांकित भारतीय संघाने १६ व्या मानांकित इटलीला पाचव्या ते आठव्या स्थानासाठी झालेल्या लढतीत शूटआऊटमध्ये पराभूत केले. त्याआधी दोन्ही संघ निर्धारित ६0 मिनिटांच्या खेळामध्ये १-१ गोलने बरोबरीत होते.
भारताने नियमित वेळेत गोल करण्याची अनेकदा मिळालेली संधी दवडली. एवढेच नव्हे तर शूटआऊटमध्येदेखील दोन्ही संघांनी पहिल्या पाच शॉटपैकी चारचे गोलमध्ये रूपांतर केले. त्यामुळे हा सामना सडनडेथपर्यंत खेचला गेला. त्यात राणी रामपॉलने सडनडेथमध्ये गोल करताना भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर गोलरक्षक सविताने जियुलियाना रुगिएरीचा फटका सुंदरपणे रोखताच भारतीय गोटात जल्लोष करण्यात आला.
त्याआधी राणी रामपॉलने ३३ व्या मिनिटाला भारताकडून बरोबरीचा गोल केला. इटलीने नवव्या मिनिटाला गोल करीत आघाडी मिळविली होती.
शूटआऊटमध्ये अनुभवी स्ट्रायकर वंदना कटारिया गोल करू शकली नाही; परंतु नवजोत कौर, अनुराधा थोकचोम, राणी रामपाल आणि दीपिका हे गोल करण्यात यशस्वी ठरले. इटलीकडून वेलेंटिना ब्राकोनी, मार्सेला कासेल, जियुलियाना रुगिएरी आणि चियारा टिड्डी यांनी गोल केले, तर डालिला मिराबेला हिचा भारतीय गोलरक्षक सविताने गोल करण्याचा प्रयत्न हाणून पाडला.
भारताने इटलीविरुद्ध सुरुवातीलाच वर्चस्व राखले; परंतु ते गोल करण्यात अपयशी ठरले. भारताने तिसऱ्या आणि सहाव्या मिनिटाला गोल करण्याची सुवर्णसंधी गमावली. इटलीने नवव्या मिनिटाला प्रत्युत्तरात हल्ला केला आणि एलिजाबेथ बासेला रिबाऊंडवर गोल करण्यात यशस्वी ठरली.
त्यानंतरही भारताने दबदबा निर्माण केला; परंतु गोल करण्यात पुन्हा अपयश आले. भारताने २९ व्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी कॉर्नरदेखील गमावला. त्यामुळे इटली मध्यंतरास १-0 अशी आघाडीवर होती.
भारताने उत्तरार्धात बरोबरीचा गोल केला. राणी रामपालने इटलीची कर्णधार टिड्डीकडून चेंडू आपल्या ताब्यात घेतला आणि एका अन्य डिफेंडर व गोलरक्षक मार्टिना चिरिकोला चकवताना शानदार बरोबरीचा गोल केला. (वृत्तसंस्था)

Web Title: India beat Italy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.