भारत ठोकणार विजयाचा ‘षट्कार’
By Admin | Updated: March 14, 2015 00:23 IST2015-03-14T00:23:01+5:302015-03-14T00:23:01+5:30
पाचही सामन्यांत वर्चस्वपूर्ण कामगिरी करून विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक देणाऱ्या चॅम्पियन भारतीय संघाचा उद्या शनिवारी ‘ब’ गटाचा

भारत ठोकणार विजयाचा ‘षट्कार’
आॅकलंड : पाचही सामन्यांत वर्चस्वपूर्ण कामगिरी करून विश्वचषकाच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक देणाऱ्या चॅम्पियन भारतीय संघाचा उद्या शनिवारी ‘ब’ गटाचा अखेरच्या साखळी लढतीत झिम्बाब्वेविरुद्ध विजयाचा ‘षट्कार’ खेचण्याचा निर्धार कायम आहे. भारताने उद्या विजय मिळविल्यास सलग सहावा तसेच विश्वचषकात तो दहावा विजय ठरेल.
विंडीजवरील विजयाचा अपवाद वगळता अन्य सर्वच सामने भारताने एकतर्फी जिंकले. विंडीजने वाका मैदानावर भारताला कडवे आव्हान दिले होते. झिम्बाब्वेविरुद्धचा सामना औपचारिक असेल; पण या सामन्यातही वर्चस्व गाजविण्याची तयारी आहे. ईडन पार्कमध्ये भारतीय खेळाडू सरावाच्या दृष्टीने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात उत्कृष्ट कामगिरी करण्यात कसर शिल्लक ठेवणार नाहीत. भारताने २०११च्या विशचषकात अखेरचे ४ सामने जिंकले. सध्याच्या स्पर्धेत उद्या विजय साजरा झाल्यास ‘परफेक्ट टेन’ नोंदविण्यात यश येईल.
आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये विश्वचषकासाठी ज्या खेळपट्ट्या बनविण्यात आल्या, त्या फलंदाजांना अनुकूल मानल्या जातात. भारताची फलंदाजी भक्कम आहे. सर्व
सातही फलंदाजांनी धावा काढल्या असल्याने संघात बदल करण्याचे कारण नाही. गोलंदाजांनीही प्रतिस्पर्धी संघाला ५ सामन्यांत बाद केले. कर्णधाराच्या डावपेचांचे तंतोतंत पालन करून शमी, आश्विन आणि मोहित शर्मा यांनी सर्वच फलंदाजांना त्रस्त केले. शमीने १२, तर आश्विनने ११ गडी बाद केले आहेत. आश्विन फलंदाजांवर दबाव टाकण्यात तरबेज मानला जातो. उमेश यादव आणि रवींद्र जडेजा यांनीदेखील स्वत:चे काम चोखपणे बजावले. क्षेत्ररक्षणातही भारतीय खेळाडू मागे नाहीत. अप्रतिम झेल आणि क्षेत्ररक्षणाद्वारे त्यांनी चाहत्यांचे लक्ष वेधले. भारतीय संघाची भक्कम बाजू ही फलंदाजी आहे. शिखर धवन ३३३ धावांसह पहिल्या ५ फलंदाजांमध्ये सहभागी झाला आहे.
झिम्बाब्वेबाबत बोलायचे झाल्यास कर्णधार एल्टन चिगुम्बुरा जखमी झाल्याने ब्रँडन टेलर नेतृत्व करेल. विश्वचषकानंतर निवृत्तीची टेलरने घोषणा केली आहे. झिम्बाब्वे भारतासाठी अडथळा ठरेल, असे वाटत नाही; पण हा संघ तगडे आव्हान देऊ शकतो. टेलर व सीन विलियम्स यांनी खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांचा भक्कम सामना केल्यास लढत रंगतदार होईल. (वृत्तसंस्था)