भारताची फ्रान्सवर २-० गोलनी मात

By Admin | Updated: August 4, 2015 22:41 IST2015-08-04T22:41:20+5:302015-08-04T22:41:20+5:30

उत्कृष्ट आक्रमण व त्याला मिळालेल्या बचाव फळीच्या सुरेख साथीमुळे भारताने यजमान फ्रान्स संघाला २-० नी नमवून आपल्या युरोप दौऱ्याची धडाक्यात

India beat France 2-0 | भारताची फ्रान्सवर २-० गोलनी मात

भारताची फ्रान्सवर २-० गोलनी मात

ले तैक्वेट, फ्रान्स : उत्कृष्ट आक्रमण व त्याला मिळालेल्या बचाव फळीच्या सुरेख साथीमुळे भारताने यजमान फ्रान्स संघाला २-० नी नमवून आपल्या युरोप दौऱ्याची धडाक्यात सुरुवात केली. चिंगलेनसना सिंह, एस. व्ही. सुनील यांनी गोल करून संघाचा विजय साकार केला.
सरदारसिंग याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने युरोप दौऱ्याची विजयी सुरवात केली. या सामन्यात सुरुवातीपासूनच भारतीय खेळाडूंचे वर्चस्व होते. चिंगलेनसनाने १८व्या मिनिटाला गोल करून भारतीय संघाचे गोल खाते उघडून दिले. फ्रान्सच्या बचाव फळीतील खेळाडूंनी केलेल्या चुकांचा पुरेपूर फायदा उठवून चिंगलेनसनाने सुरेख गोल केला.
भारतीय संघाने जोरदार आक्रमण करून फ्रान्सच्या खेळाडूंवर दबाव निर्माण करण्यात यश मिळविले. सरदारसिंग, एस. के. उथप्पा, दानीश मुज्तबा, देविंदर वाल्मीकी यांच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने चेंडूवर सर्वाधिक नियंत्रण मिळविले. दुसरीकडे सुनील, रमणदीपसिंग व आकाशदीपसिंग यांनी फ्रान्सच्या बचाव फळीतील खेळाडूंना जखडून ठेवले.
सामन्याच्या २६व्या मिनिटाला सुनील याने मैदानी गोल करून आघाडी २-० अशी वाढविली. ही आघाडी कायम राखण्यात भारतीय खेळाडूंना यश आले. फ्रान्सने तिसऱ्या क्वार्टरमध्ये गोल करण्याचा खूप प्रयत्न केला. काही सुरेख चाली रचून त्यांनी भारतीय गोलजाळ्याच्या दिशेने जोरदार मुसंडी मारली. मात्र, बचावफळीतील खेळाडूंनी फ्रान्सचे आक्रमण परतवून लावले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये फ्रान्सला पेनल्टी कॉर्नर मिळाला. भारतीय गोलरक्षक पी. आर. श्रीजेश याने उत्कृष्ट बचाव केला. चौथ्या क्वार्टरमध्येदेखील फ्रान्सने गोल करण्याची संधी निर्माण केली. दोन्ही वेळा श्रीजेशने त्यांची गोल करण्याची संधी विफल केली. (वृत्तसंस्था)

Web Title: India beat France 2-0