भारताचा आफ्रिकेवर १२४ धावांनी विजय, मालिका २-० जिंकली
By Admin | Updated: November 27, 2015 15:30 IST2015-11-27T10:36:11+5:302015-11-27T15:30:09+5:30
अश्विनने भेदक गोलंदाजी करून ७ बळी टिपल्यानेव भारताने आफ्रिकेविरुद्धची तिसरी कसोटी १२४ धावांनी जिंकली असून मालिका २-० अशी खिशात टाकली.

भारताचा आफ्रिकेवर १२४ धावांनी विजय, मालिका २-० जिंकली
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २७ - अश्विनने भेदक गोलंदाजी करून ७ बळी टिपल्यानेव भारताने आफ्रिकेविरुद्धची तिसरी कसोटी १२४ धावांनी जिंकली असून चार कसोटी सामन्यांची ही मालिका २-० अशी खिशात टाकली. भारताच्या ३१० धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव अवघ्या १८५ धावांत संपुष्टात आला. आर. अश्विनने पहिल्या डावात ५ आणि दुस-या डावात ७ असे एकूण १२ बळी टिपले.
कसोटीच्या तिस-या दिवशी आफ्रिकेने २ बाद ३२ वरून दुस-या डावाची सुरूवात केली. मात्र १७व्या षटकांत एल्गर (१८) आणि २३व्या षटकांत एबी डी व्हिलियर्स (९) बाद झाल्याने आफ्रिकेला २ मोठे धक्के बसले. तेव्हा आफ्रिकेची स्थिती २३ षटकांत ४ बाद ४८ अशी झाली. मात्र त्यानंतर आमला (३९) व ड्यू प्लेसिस (३९) या दोघांनी संयमी खेळी करून आफ्रिकेला शंभरी गाठून दिली. मात्र ६० व्या षटकात आमला तर ७१ व्या षटकात ड्यू प्लेसिस बाद झाले आणि आफ्रिकेच्या विजयाच्या उरल्या सुरल्या आशाही संपुष्टात आल्या. त्यानंतर ड्युमिनी (३५), व्हिलॅस (१), हार्मर (१३), मॉर्केल (१) धावांवर बाद झाले,रबाडा सहा धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी काल भारताचा दुसरा डाव १७३ धावांवर संपुष्टात आला आणि त्यांनी आफ्रिकेसमोर एकूण ३१० धावांचे लक्ष्य ठेवले.