भारतासमोर विजयासाठी २७१ धावांचे लक्ष्य
By Admin | Updated: October 18, 2015 17:28 IST2015-10-18T17:28:36+5:302015-10-18T17:28:50+5:30
क्विंटन डीकॉकचे दमदार शतक आणि फाफ डू प्लेसिसचे अर्धशतकाच्या आधारे दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ७ गडी गमावत २७० धावा केल्या आहेत.

भारतासमोर विजयासाठी २७१ धावांचे लक्ष्य
ऑनलाइन लोकमत
राजकोट, दि. १८ - क्विंटन डीकॉकचे दमदार शतक आणि फाफ डू प्लेसिसचे अर्धशतकाच्या आधारे दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ७ गडी गमावत २७० धावा केल्या आहेत. भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करत आफ्रिकेच्या फलंदाजांना लगाम लावला.
राजकोट येथील तिस-या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. क्विंटन डीकॉक आणि डेव्हिड मिलर या सलामीच्या जोडीने आफ्रिकेला अर्धशतक गाठून दिले. मात्र हरभजनच्या फिरकीवर मिलरने अजिंक्य रहाणेकडे झेल दिला व आफ्रिकेची सलामीची जोडी ७२ धावांवर फुटली. त्यापाठोपाठ अमित मिश्राने हाशिम आमलाला ५ धावांवर असताना यष्टिचित केले. मात्र यानंतर डीकॉकने प्लेसिसच्या साथीने आफ्रिकेचा डाव पुढे नेला. या जोडीने तिस-या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. आफ्रिका ३०० चा टप्पा गाठेल असे वाटत असतानाच प्लेसिस ६० धावांवर बाद झाला आणि ही जोडी फोडण्यात भारताला यश आले. यानंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन करत आफ्रिकेच्या फलंदाजांना रोखले. डिव्हिलियर्स ४, जे पी ड्यूमिनी १४ आणि डेल स्टेन १२ धावांवर बाद झाला. फरहान बेहरदीनने नाबाद ३३ धावांची खेळी करत आफ्रिकेला २७० धावांचा पल्ला गाठून दिला. भारतातर्फे मोहित शर्माने दोन, तर अमित मिश्रा, हरभजन सिंग आणि अक्षर पटेलने प्रत्येकी एक विकेट घेतली.