भारत अ १३५ धावांत गारद
By Admin | Updated: July 30, 2015 01:24 IST2015-07-30T01:24:59+5:302015-07-30T01:24:59+5:30
श्रीलंका दौऱ्याआधी सराव व्हावा, या उद्देशाने आॅस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात खेळणारा भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली फ्लॉप ठरला.

भारत अ १३५ धावांत गारद
चेन्नई : श्रीलंका दौऱ्याआधी सराव व्हावा, या उद्देशाने आॅस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध दुसऱ्या अनधिकृत कसोटी सामन्यात खेळणारा भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली फ्लॉप ठरला. त्याचबरोबर त्याचा राष्ट्रीय संघातील सहकारी चेतेश्वर पुजारादेखील स्वस्तात बाद झाल्यामुळे भारतीय अ संघावर फक्त १३५ धावांत गारद होण्याची नामुष्की ओढवली.
प्रत्युत्तरात आॅस्ट्रेलिया अ संघाने सावध सुरुवात करताना पहिल्या दिवसअखेर १३ षटकांत बिनबाद ४३ धावा केल्या. आता ते भारत अ संघापासून ९२ धावांनी पिछाडीवर आहेत. आजचा खेळ थांबला, तेव्हा कॅमरन बॅनक्राक्ट २४ व कर्णधार उस्मान ख्वाजा १३ धावांवर खेळत होते.
माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या निधनामुळे दोन्ही संघ या सामन्यात आपल्या बाहूवर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले होते. या दोन्ही संघांनी एम. ए. चिंदबरम स्टेडियम येथे सामना सुरू होण्याआधी मौन ठेवून कलाम यांना श्रद्धांजली वाहिली. भारत अ संघाचा कर्णधार पुजाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय आॅस्ट्रेलियाच्या वेगवान व फिरकी असे मिश्रण असलेल्या गोलंदाजी आक्रमणाने चुकीचा ठरवला. भारतीय फलंदाजांना धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला. भारतातर्फे करुण नायरने सर्वाधिक ५० धावा केल्या. भारत अने त्यांचे अखेरचे ६ फलंदाज अवघ्या २६ धावांत गमावले.
आॅस्ट्रेलियाकडून वेगवान गोलंदाज गुरिंदर संधू सर्वांत यशस्वी ठरला. त्याने २५ धावांत ३ गडी बाद केले. मध्यमगती गोलंदाज अँड्र्यू फेकेटे (३३ धावांत २) आणि फिरकी गोलंदाज एस्टन एगर (२३ धावांत २ बळी) व स्टीव्ह ओकीफी (३० धावांत २ बळी) यांनी त्याला चांगली साथ दिली.
भारतीय कसोटी संघाच्या अंतिम ११ जणांत स्थान पक्के करण्यासाठी कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार असणाऱ्या पुजाराने (११) डावाची सुरुवात केली; परंतु सलामीवीर म्हणून त्याला यश मिळाले नाही. त्याला मध्यमगती गोलंदाज मार्कस् स्टोनिस याने त्रिफळाबाद करून आॅस्ट्रेलिया अला पहिले यश मिळवून दिले. खेळपट्टीवर बराच काळ घालवल्यानंतरही मुकुंदला ४९ चेंडूंत फक्त १५ धावा करता आल्या. त्यात २ चौकारांचा समावेश होता. ओकीफीने पुढील षटकात श्रेय अय्यर (१) याला बाद करून भारताची स्थिती ४ बाद ५३ अशी केली.
नायर आणि नमन ओझा यांनी पडझड थांबवताना पाचव्या गड्यासाठी जवळपास ३३ षटकांत ५६ धावांची भागीदारी केली. या दोघांत विशेषत: नमनला धावा काढण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. एक वेळ त्याने ७० चेंडूंत फक्त ३ धावाच केल्या होत्या. नमनवर वेगाने धावा काढण्याचा दबाव वाढला आणि अशातच एगरला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न त्याच्या अंगलट आला. वेडने त्याला यष्टिचीत करण्यात कोणतीही चूक केली नाही. नमनने १० धावा केल्या; परंतु
त्यासाठी त्याला ८४ चेंडूंचा
सामना करावा लागला.
त्यानंतर भारताचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. त्याचे तळातील फलंदाज पुढील ११ षटकांत तंबूत परतले.
नायरने अर्धशतक केल्यानंतर फेकेटे याच्या गोलंदाजीवर झेल देऊन बसला. त्याने त्याच्या डावात १५३ चेंडूंचा सामना केला आणि ५ चौकार मारले. संधूने भारताची तळातील फळी तंबूत पाठवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्याने बाबा अपराजित (१२) आणि वरुण अॅरोन (०) यांना एकाच षटकात बाद केले. त्यानंतर प्रज्ञान ओझा (०) याला त्रिफळाबाद करून भारतीय संघाच्या डावाला पूर्णविराम दिला.(वृत्तसंस्था)
लक्ष कोहलीवर...
कोहलीला या सामन्यात बीसीसीआयने खेळण्याचा
विशेष आग्रह केला होता. श्रीलंकेविरुद्ध १२ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्याला सरावाची संधी मिळावी, हा उद्देश त्यामागे होता.
कोहलीने सुरुवातीला गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला आणि प्रारंभी एक चौकार व षटकारही मारला; परंतु दुसऱ्या बाजूने सलामीवीर अभिनव मुकुंद बाद झाल्याने कोहली एकदम सावध होऊन खेळू लागला. मुकुंदने ओकीफीच्या चेंडूवर
यष्टिरक्षक मॅथ्यू वेडच्या हाती झेल सोपवला.
कोहलीला गोलंदाजी करण्यासाठी आतुर असलेल्या एगरने अखेर भारतीय कसोटी कर्णधाराला पायचीत करण्यात यश मिळविले. कोहलीने १६ धावांसाठी ४२ चेंडूंचा सामना केला.