बीसीसीआयची प्रतिमा सुधारणार

By Admin | Updated: October 4, 2015 23:53 IST2015-10-04T23:53:50+5:302015-10-04T23:53:50+5:30

बीसीसीआयचे नवनियुक्त अध्यक्ष शशांक मनोहर यांनी बोर्डाची प्रतिमा सुधारण्यासाठी अनेक विधायक पावले उचलण्याची घोषणा केली. त्यात लोकपालच्या नियुक्तीचाही समावेश आहे.

Improving BCCI image | बीसीसीआयची प्रतिमा सुधारणार

बीसीसीआयची प्रतिमा सुधारणार

मुंबई : बीसीसीआयचे नवनियुक्त अध्यक्ष शशांक मनोहर यांनी बोर्डाची प्रतिमा सुधारण्यासाठी अनेक विधायक पावले उचलण्याची घोषणा केली. त्यात लोकपालच्या नियुक्तीचाही समावेश आहे. वादग्रस्त ठरलेला हितसंबंध गुंतल्याचा मुद्दा लोकपालच्या नियुक्तीमुळे निकाली निघण्याची शक्यता आहे.
बोर्डाच्या कार्याची दिशा स्पष्ट करताना मनोहर यांनी काही महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा केली. त्यात महिला क्रिकेटपटूंना केंद्रीय करारात स्थान देणे, सर्व संलग्न राज्य संघटनांच्या खर्चावर लक्ष देण्यासाठी एकच आॅडिटर आणि बोर्डाच्या कार्यात पारदर्शकता आणण्यासाठी बीसीसीआयची बॅलन्सशीट बोर्डाच्या वेबसाईटवर प्रकाशित करणे आदींचा समावेश आहे. रविवारी झालेल्या बोर्डाच्या विशेष आमसभेमध्ये अविरोध अध्यक्षपदी निवड झालेले मनोहर म्हणाले, ‘सरकारच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यास उत्सुक असून एखाद्या चौकशी एजन्सीला बीसीसीआयसोबत जोडण्याचा विचार आहे. भ्रष्टाचार प्रकरणामध्ये चौकशी करण्याचा अधिकार बीसीसीआयला नाही, त्यामुळे अशी योजना राबविणे विचाराधीन आहे.’
मनोहर यांनी बोर्डाच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी स्वतंत्र चौकशीअधिकाऱ्याच्या नियुक्तीला प्राथमिकता दिली. निवडणुकीच्या स्थितीत बोर्डाच्या अध्यक्षाकडे तीन मतांचा अधिकार असतो. त्यात राज्य संघटनेचे मत, अध्यक्षाचे मत आणि निर्णायक मत यांचा समावेश आहे. दालमिया यांनी २००४ च्या निवडणुकीमध्ये या तीन मतांचा वापर करीत रणबीरसिंग महेंद्रा यांना शरद पवार यांच्याविरुद्ध विजय मिळवून दिला होता. (वृत्तसंस्था)
----------‘श्रीनिवासन यांनी ठाकुरांच्या
विरोधातील खटला मागे घ्यावा’
बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी आज एन. श्रीनिवासन यांना बोर्डाचे सचिव अनुराग ठाकूर यांच्याविरोधातील खटला मागे घेण्याचे आवाहन केले आहे. मनोहर यांनी टीएनएचे प्रतिनिधी पी. एस. रमण यांना सांगितले की हा निरोप श्रीनिवासन यांच्यापर्यंत पोहोचवा.
बीसीसीआयच्या विशेष बैठकीत मनोहर यांनी रमण यांना सांगितले की, अनुराग ठाकूर यांच्या विरोधात खोटी साक्ष दिल्याचा आरोप करत दाखल केलेली जनहित याचिका मागे घ्यावी. ते त्या मुद्द्यावर कायदेशीर प्रक्रियेतून वाचू शकतात. या मुद्द्यांवर चर्चा करून मार्ग निघू शकतो.
बैठक सुरू असतानाच एमसीएचे अध्यक्ष अजय शिर्के यांनी थेट केरळच्या टी. सी. मॅथ्यू यांना प्रश्न केला की, श्रीनिवासन यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेत ठाकूर यांच्या विरोधात प्रतिज्ञापत्र कसे दिले. सदस्यांनी कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनाही याबाबत धारेवर धरले.
‘सुडाच्या भावनेने काम करणार नाही’
च्बीसीसीआयचे नवनियुक्त अध्यक्ष अ‍ॅड. शशांक मनोहर यांनी बोर्डाचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर दिले की, सुडाच्या भावनेने कोणतेही काम करणार नाही. सोबतच मनोहर यांनी श्रीनिवासन यांची बोर्डाच्या सर्वश्रेष्ठ सचिवांमध्ये गणना केली.
च्आयसीसी चेअरमनच्या रूपात श्रीनिवासन यांच्या भविष्यावर मनोहर यांनी स्पष्टता केली नाही. मनोहर म्हणाले की, आम्ही सुडाच्या भावनेने काम करणार नाही. तमिळनाडू क्रिकेट संघ श्रीनिवासन यांच्या नेतृत्वातील गटासह संपूर्ण ३० सदस्य एकजूट आहेत. सगळेच बोर्डाची प्रतिमा सुधारण्यासाठी एकत्र येऊन काम करतील.
चाहत्यांचे प्रेम व देशातील क्रिकेट चाहत्यांमुळे बीसीसीआय सध्या मोठा ब्रँड झाला आहे. काही अप्रिय घटना घडल्यामुळे चाहत्यांच्या विश्वासाला तडा गेला आहे. बोर्डाला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून देणे बोर्डाच्या सर्व प्रतिनिधींची जबाबदारी आहे. बोर्डाला पुन्हा पूर्वीची प्रतिमा प्राप्त करून देण्यासाठी मला दोन महिन्यांचा कालावधी द्यावा, अशी माझी अपेक्षा आहे. मी आगामी दोन वर्षे अध्यक्षपदी आहे.
- शशांक मनोहर
------
‘मनोहर’ अजेंडा...
बीसीसीआयने खेळाडू, प्रशिक्षक आणि स्टाफसाठी नियम तयार केलेले आहेत. आम्ही लोकपाल किंवा स्वतंत्र चौकशीअधिकाऱ्याच्या नियुक्तीची योजना तयार करीत आहोत. हा अधिकारी बोर्डापासून अलिप्त राहून हितसंबंध गुंतल्याच्या मुद्यावर लक्ष देईल.
क्रिकेटला भ्रष्टाचारापासून मुक्त ठेवण्यासाठी नियम तयार करावे लागतील. खेळाडूंना माहिती देण्यासाठी अधिक कार्यक्रम आयोजित करू.
बीसीसीआयकडे चौकशी अधिकारी नाही. चौकशी एजन्सीच्या नियुक्तीसाठी मी संघटनेचे सचिव अनुराग ठाकूर यांच्यामार्फत केंद्र सरकारसोबत चर्चा करणार आहे. चौकशी एजन्सीच्या नियुक्तीमुळे चाहत्यांचा विश्वास जिंकण्यात आम्हाला मदत मिळेल, अशी आशा आहे. त्याचप्रमाणे राज्य संघटनेच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र आॅडिटरची नियुक्ती करण्याचा विचार आहे. त्यामुळे बीसीसीआयकडून मिळालेल्या अनुदानाचा कसा उपयोग करण्यात आला, याची माहिती मिळेल.
क्रिकेट व अन्य कार्यासाठी बीसीसीआयतर्फे संलग्न संघटनांना मोठी राशी देण्यात येते. राज्य संघटनेतर्फे नियुक्त करण्यात आलेला आॅडिटर राज्य संघटनांच्या खात्याचे आॅडिट करतो. राज्य संघटनेच्या जमा-खर्चाचे आॅडिट करण्यासाठी बोर्डातर्फे आॅडिटरची नियुक्ती करण्याची आमची योजना आहे. आॅडिट पूर्ण झाल्यानंतरच संघटनांना बीसीसीआयतर्फे पूर्ण अनुदान देण्यात येईल. बोर्डातर्फे देण्यात येणाऱ्या अनुदानाचा योग्य उपयोग होत आहे किंवा नाही, यावर लक्ष देण्याचा बोर्डाला पूर्ण अधिकार आहे.
बीसीसीआयमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी बोर्डाची घटना आणि खर्चाबाबतची माहिती बोर्डाची अधिकृत वेबसाईट ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.बीसीसीआय.टीव्ही’ यावर टाकण्याची योजना आहे,
आम्ही बोर्डाची घटना आणि नियम वेबसाईटवर टाकू शकतो. २५ लाख किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या खर्चाची माहिती वेबसाईटवर टाकायला हवी. वर्षाच्या अखेर बोर्डाचे जमा-खर्च विवरणपत्र वेबसाईटवर टाकले जाऊ शकते. त्यामुळे जनतेसाठी बोर्डाच्या खर्चाची माहिती सहज उपलब्ध होईल.
बोर्डाबाबत माहिती मिळत नसल्यामुळे यात काहीतरी काळबेरे असल्याची लोकांची धारणा झालेली आहे. वेबसाईटवर आॅडिट रिपोर्ट मिळाला तर त्यांची धारणा बदलण्यास मदत मिळेल.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे कार्य पुनर्वसन केंद्राऐवजी सेंटर आॅफ एक्सीलेन्स म्हणून करायला हवे. यामुळे उत्कृष्ट क्रिकेटपटू भारताला मिळतील. एनसीएने पूर्ण वर्षभर काम करायला हवे. देशात दर्जेदार फिरकीपटू दिसत नाहीत. एनसीए असे
केंद्र असायला हवे की, गरज असेल
तेव्हा पर्यायी खेळाडू उपलब्ध करून
द्यायला हवे.
बीसीसीआयच्या वित्त समितीने महिला क्रिकेटपटूंचा केंद्रीय करारात समावेश करण्याचा प्रस्ताव पारित केलेला आहे. बीसीसीआय महिला क्रिकेटपटूंचा केंद्रीय करारात समावेश करेल. त्यामुळे भविष्यात जास्तीत जास्त महिला खेळाडू या खेळाकडे वळतील. बीसीसीआयचे सर्व जुने रेकॉर्ड मुख्यालयामध्ये उपलब्ध मिळतील. राज्य संघटनेच्या सदस्यांना हा रेकॉर्ड बघता येईल.
मला निर्णायक मताबाबत काही अडचण नाही, पण घटनेत बदल झाल्याशिवाय अध्यक्षाच्या मताचा वापर करावा, असे मला वाटत नाही.
भारतात आयसीसी टी-२० विश्वकप स्पर्धेचे आयोजन संभाव्य सर्वोत्तम पद्धतीने करण्यासाठी प्रयत्न राहील. निवडणुकीच्या स्थितीत घटनेमध्ये बदल झाल्याशिवाय अध्यक्षपदाच्या मताचा वापर करणार नाही.

Web Title: Improving BCCI image

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.