बीसीसीआयची महत्त्वाची बैठक आज
By Admin | Updated: February 8, 2015 02:01 IST2015-02-08T02:01:59+5:302015-02-08T02:01:59+5:30
(बीसीसीआय) बहुप्रतीक्षित वार्षिक बैठकीची (एजीएम) तारीख निश्चित करण्यासाठी रविवारी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये कार्यकारी समितीच्या बैठकीचे आयोजन केले आहे.

बीसीसीआयची महत्त्वाची बैठक आज
चेन्नई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) बहुप्रतीक्षित वार्षिक बैठकीची (एजीएम) तारीख निश्चित करण्यासाठी रविवारी येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये कार्यकारी समितीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. आयपीएलच्या सहाव्या पर्वातील भ्रष्टाचार प्रकरणात चौकशी समितीने दिलेल्या अहवालावर
२२ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर बीसीसीआय कार्यकारिणीची प्रथमच बैठक होत आहे. न्यायालयाने दुटप्पी भूमिकेचा उल्लेख करताना एन. श्रीनिवासन यांना बोर्ड किंवा आयपीएल फ्रॅन्चायझीमधील भागीदारी याबाबत एकाची निवडीचे निर्देश दिले होते.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, श्रीनिवासन यांचे मालकी हक्क असलेल्या इंडिया सिमेंट्सने आयपीएल संघ चेन्नई सुपरकिंग्जमधील आपली भागीदारी रद्द करण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे श्रीनिवासन यांचा बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची पुन्हा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा होईल. श्रीनिवासनच्या कंपनीने बीएसईला याबाबत माहिती दिली आहे. संचालक मंडळाच्या सदस्यांची ११ फेब्रुवारी रोजी बैठक होणार
असून, त्यात सीएसके क्रिकेट लिमिटेडचे पुनर्गठन करण्यावर
चर्चा होणार आहे. कंपनीने आयपीएल फ्रॅन्चायझीला पूर्ण नवी सहायक कंपनी सीएसके क्रिकेट लिमिटेडला स्थानांतरित करण्यासाठी कागदी कारवाई पूर्ण केली आहे. (वृत्तसंस्था)
बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, ‘बोर्डाच्या कार्यकारी समिती बैठकीत सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशींवर चर्चा होणार आहे. तसेच बैठकीमध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या नावावर निर्णय होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने ५ मार्च किंवा त्यापूर्वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचे निर्देश दिले आहेत.