जलतरणाची ‘राणी’ म्हणून छाप पाडण्याचा इम्माचा निर्धार
By Admin | Updated: August 3, 2016 04:16 IST2016-08-03T04:16:14+5:302016-08-03T04:16:14+5:30
आॅस्ट्रेलियाची उदयोन्मुख जलतरणपटू इम्मा मॅककियोन रिओ आॅलिम्पिकमध्ये जलतरणामध्ये छाप सोडण्यास सज्ज आहे.

जलतरणाची ‘राणी’ म्हणून छाप पाडण्याचा इम्माचा निर्धार
रिओ : आॅस्ट्रेलियाची उदयोन्मुख जलतरणपटू इम्मा मॅककियोन रिओ आॅलिम्पिकमध्ये जलतरणामध्ये छाप सोडण्यास सज्ज आहे. इम्माचे आई-वडील जलतरणपटू असून त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. वडील रॉन यांनी १९८० व १९८४ मध्ये आॅलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला होता. ते मुलगी इम्माचे प्रशिक्षक आहे. इम्माचा भाऊ डेव्हिड आॅस्ट्रेलियाच्या आॅलिम्पिक पथकात आहे. त्यामुळे रिओ आॅलिम्पिक त्यांच्यासाठी कौटुंबिक स्पर्धा झालेली आहे. इम्मा रिओमध्ये २०० मीटर फ्रीस्टाईल, १०० मीटर बटरफ्लाय, चार बाय १०० मीटर फ्रीस्टाईल रिले, चार बाय २०० मीटर फ्रीस्टाईल रिले आणि चार बाय १०० मीटर मिडले रिलेमध्ये सहभागी होणार आहे.
अनेक टेनिसपटूंची माघार
दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर, मिलोस राओनिच, टॉमस बर्डिच, सिमोना हालेप आणि व्हिक्टोरिया अजारेंक यांच्यासह अनेक दिग्गज टेनिसपटूंनी यावेळी रिओ आॅलिम्पिकमधून माघार घेतली आहे. नोव्हाक जोकोव्हिच, अॅन्डी मरे, राफेल नदाल आणि सेरेना विलियम्सन यांच्यासारख्या खेळाडूंचा समावेश असला तरी टेनिसला आॅलिम्पिकमध्ये कायम ठेवावे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काही खेळाडूंनी दुखापतीमुळे तर काही खेळाडूंनी झिका व्हायरसमुळे आॅलिम्पिकमधून माघार घेतली आहे. त्यात सर्वांत दिग्गज खेळाडू १७ वेळा ग्रॅण्डस्लॅम जेतेपद पटकावणाऱ्या रॉजर फेडररचे नाव आहे. या व्यतिरिक्त पुरुष विभागात अव्वल २० मध्ये समावेश असलेल्या व माघार घेणाऱ्या अन्य खेळाडूंमध्ये राओनिच, बर्डिच, डोमिनिक थीम, रिचर्ड गास्केट, जॉन इस्नर, फेलिसियानो लोपेज आणि निक किर्गियोस यांचा समावेश आहे.
महिला विभागात माघार घेणाऱ्या खेळाडूंमध्ये आॅस्ट्रेलियन उपविजेती डोमिनिका सिबुलकोव्हा, हालेप, अजारेंका, बेलिंडा बेनसिच आणि कॅरोलिना पिलिसकोव्हा यांचा समावेश आहे. डोपिंगच्या कारणामुळे शारापोव्हावर दोन वर्षांची बंदी आहे. त्यामुळे तिला रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होता येणार नाही.
सौदी अरबच्या चार महिला खेळाडू सहभागी होणार
लंडन आॅलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवत इतिहास घडविणाऱ्या सौदी अरबची महिला धावपटू सराह अल अतार यावेळी मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहे. या व्यतिरिक्त तिच्या देशाच्या अन्य तीन महिला खेळाडू यावेळी आॅलिम्पिकमध्ये सहभागी होत आहेत.
अतार लंडन आॅलिम्पिकमध्ये डोक्यापासून पायापर्यत (बुरखा) पोशाख परिधान करीत ८०० मीटर दौड स्पर्धेत सहभागी झाली होती. ती सौदी अरबची पहिली महिला आॅलिम्पियन ठरली होती. अतारला त्यावेळी हिटमध्ये सर्वांत अखेरच्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. तिने तिच्या नजीकच्या प्रतिस्पर्धी खेळाडूच्या तुलनेत अर्धा मिनिट उशिरा शर्यत पूर्ण केली होती. प्रेक्षकांनी उभे राहून तिला मानवंदना दिली होती. यावेळी अतार व्यतिरिक्त सौदी अरबच्या ज्या अन्य महिला खेळाडू आॅलिम्पिकमध्ये सहभागी होत आहेत त्यात ज्युडोमध्ये वुजुम फाहमी, तलवारबाजीमध्ये लुबना अल ओमर आणि १०० मीटर दौड स्पर्धेत करिमान अबू अल जदैल यांचा समावेश आहे.
बरमुडा, समोओपेक्षा पाकचे पथक लहान
कराची : पाकिस्तानने क्रिकेट व हॉकीमध्ये विश्वपातळीवर छाप सोडली असली असली तरी रिओ आॅलिम्पिकमध्ये मात्र त्यांचे केवळ सात खेळाडूंचे पथक सहभागी होत आहे. पाकिस्तानचे पथक समोआ, पापुआ न्यूगिनी आणि बरमुडा यांच्यासारख्या लहान बेटांच्या तुलनेतही छोटे आहे. पाकिस्तानचा हॉकी संघ रिओ आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळवण्यात अपयशी ठरला. (वृत्तसंस्था)
>जगभरातील २०६ देशांच्या खेळाडूंचे लक्ष्य रिओ आॅलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावण्याचे असेल,पण नेहमीप्रमाणे सुवर्णपदकामध्ये यावेळीही सोन्याच्या तुलनेच चांदीचे प्रमाण अधिक आहे. सीएनएनच्या अहवालानुसार आॅलिम्पिकसाठी तयार करण्यात आलेल्या सुवर्ण पदकामध्ये ४९४ ग्रॅम चांदी आणि केवळ ६ ग्रॅम सोने राहील.
बाजारामध्ये याचे मूल्य ५८७ डॉलर्स (जवळजवळ ३९ हजार रुपये) आहे. आॅलिम्पिकमध्ये शुद्ध सोन्याचे अखेरचे सुवर्णपदक १९१२ मध्ये स्टॉकहोम आॅलिम्पिकदरम्यान देण्यात आले होते. ब्राझीलने रिओ आॅलिम्पिकसाठी पाच हजारपेक्षा अधिक पदके तयार केली आहे. त्यात सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांचा समावेश आहे.