स्पोर्ट्स फ्रॉड बिलचा विचार
By Admin | Updated: August 1, 2015 00:28 IST2015-08-01T00:28:34+5:302015-08-01T00:28:34+5:30
बीसीसीआय ही संस्था केंद्रीय क्रीडा मंत्रालयाअंतर्गत मान्यताप्राप्त संस्था नाही, असे सांगणारे केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दुसऱ्याच दिवशी बीसीसीआयने कामात पारदर्शीपणा जोपासण्याचा सल्ला

स्पोर्ट्स फ्रॉड बिलचा विचार
नवी दिल्ली : बीसीसीआय ही संस्था केंद्रीय क्रीडा मंत्रालयाअंतर्गत मान्यताप्राप्त संस्था नाही, असे सांगणारे केंद्रीय क्रीडामंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी दुसऱ्याच दिवशी बीसीसीआयने कामात पारदर्शीपणा जोपासण्याचा सल्ला दिला आहे. याच बरोबर क्रीडा क्षेत्रातील चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी स्पोर्ट्स फ्रॉड बिल आणण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.
बीसीसीआय सर्वसामान्यांप्रती उत्तरदायी असल्याचे सांगून सोनोवाल म्हणाले,‘ या संस्थेने स्वत:च्या कामात पारदर्शीपणा बाळगण्याची गरज आहे. बीसीसीआय ही सामाजिक संस्था असल्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण आहे. मग त्यांनी स्वत:च्या कामाचा लेखाजोखा जनतेपुढे मांडण्यास काय हरकत आहे, असे माझे मत असून लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी आमच्या कामात मुळीच भ्रष्टाचार नाही, हे सांगण्याची बीसीसीआयला संधी आहे.’
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरण उघड झाल्यानंतर क्रीडा क्षेत्रातील चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी सरकारला ‘स्पोर्टस् फ्रॉड बिल’ आणण्यावर विचार करावा लागला. हे बिल मंजुरीसाठी संसदेत सादर केले जाईल. सध्या क्रीडा मंत्रालय या कामात व्यस्त आहे शिवाय विधी मंत्रालयाकडून हिरवी झेंडी मिळण्याची प्रतीक्षा असल्याची माहिती सोनोवाल यांनी पत्रकारांना दिली.
मॅचफिक्सिंग प्रकरणावर तोडगा निघावा यासाठी आम्ही हे विधेयक आणू इच्छितो. क्रीडा क्षेत्र भ्रष्टाचारमुक्त व्हावे हा यामागील हेतू आहे. संसदेत या विधेयकाला पाठिंबा देण्याची जबाबदारी खासदारांवर असेल, असे ते म्हणाले.(वृत्तसंस्था)
दुतीचंद ‘टॉप’ मध्ये नाही
- क्रीडा लवादाने मैदानावर परतण्यास हिरवी झेंडी दिल्यानंतर धावपटू दुतीचंद हिचा टार्गेट आॅलिम्पिक प्लॅटफॉर्म(टॉप) या योजनेत समावेश करणार का, असा सवाल करताच सोनोवाल यांनी स्पष्ट उत्तर देण्याचे टाळले.
ते म्हणाले,‘ दुती महत्त्वाची खेळाडू आहे. आम्ही तिला क्रीडा लवादाकडे अपील करण्यापासून कायदेशीर लढाई लढेपर्यंत मदत केली, तसेच खर्च केला. पण टॉप योजनेत तिचा समावेश करण्याचा सध्यातरी विचार नाही.
टॉप योजनेसाठी निवडण्यात येणाऱ्या खेळाडूंच्या निवड प्रक्रियेत आम्ही हस्तक्षेप करीत नाही. त्यासाठी दिग्गज खेळाडूंचा समावेश असलेली एक निवड समिती आहे. ही समिती खेळाडूंची निवड करते आणि त्यांना टॉप योजनेत सामावून घेते.’