संशयास्पद गोलंदाजी शैलीच्या चाचणीसाठी आयसीसी सेन्सर लावणार
By Admin | Updated: September 12, 2014 02:13 IST2014-09-12T02:05:54+5:302014-09-12T02:13:15+5:30
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) संशयास्पद गोलंदाजी शैलीच्या चाचणीसाठी सेन्सर लावण्याची तयारी केली आहे;

संशयास्पद गोलंदाजी शैलीच्या चाचणीसाठी आयसीसी सेन्सर लावणार
दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) संशयास्पद गोलंदाजी शैलीच्या चाचणीसाठी सेन्सर लावण्याची तयारी केली आहे; पण २०१५ च्या मध्यापर्यंत याचा वापर करण्याची शक्यता नाही.
आयसीसीचे क्रिकेट महासंचालक ज्योफ एलार्डिस म्हणाले,‘सेन्सरच्या तंत्रावर बरेच काम झालेले आहे; पण याचा वापर करण्यासाठी अद्याप अडथळे आहेत.’
अजमलवर बंदी घालण्यात आल्यामुळे सदोष गोलंदाजी शैलीबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पंच सदोष गोलंदाजी शैलीबाबत सामनाधिकाऱ्यांना योग्य अहवाल सादर करण्यात अपयशी ठरत आहेत. या तंत्राच्या माध्यमातून शैलीबाबत थेट माहिती मिळत असल्यामुळे पंचांना त्याचा लाभ मिळणार आहे. आयसीसी आॅस्ट्रेलियन संशोधकासह सेन्सरच्या तंत्रावर काम करीत आहे. हे सेन्सर्स खेळाडूंच्या ड्रेसवर लावण्यात येईल. त्या माध्यमातून गोलंदाजी शैलीची चाचणी घेता येईल.
एलार्डिस म्हणाले, ‘हे तंत्र तिसऱ्या व अखेरच्या टप्प्यात आहे; पण वापराबाबत अद्याप आव्हान कायम आहे. सामन्यादरम्यान याचा वापर करण्यापूर्वी अद्याप थोडे काम शिल्लक आहे. अखेरचा टप्पा पूर्ण होण्यासाठी कदाचित १८ महिने किंवा दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो; पण २०१५ च्या मध्यापर्यंत याच्या वापराची हमी देता येणार नाही.’ (वृत्तसंस्था)