हैदराबाद मुंबईचा धडाका रोखणार?
By Admin | Updated: May 8, 2017 11:25 IST2017-05-08T00:41:53+5:302017-05-08T11:25:42+5:30
सलग दोन पराभव पत्करल्यानंतर गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादपुढे प्लेआॅफमधील जागा निश्चित करण्यासाठी विजयाची

हैदराबाद मुंबईचा धडाका रोखणार?
हैदराबाद : सलग दोन पराभव पत्करल्यानंतर गतविजेत्या सनरायझर्स हैदराबादपुढे प्लेआॅफमधील जागा निश्चित करण्यासाठी विजयाची आवश्यकता असून सोमवारी होणाऱ्या सामन्यात त्यांच्यापुढे आव्हान असेल ते तुफान फॉर्ममध्ये असलेल्या मुंबई इंडियन्सचे. याआधीच प्ले आॅफमध्ये प्रवेश केलेल्या मुंबईचा प्रयत्न पहिल्या दोन स्थानांमध्ये राहून क्वालिफायर सामना खेळण्याचा असल्याने ते हैदराबादविरुद्ध पूर्ण ताकदीने खेळतील. त्यामुळे हैदराबादला घरच्या मैदानावर सर्वोत्तम खेळ करण्याशिवाय पर्याय नसेल.
हैदराबाद सध्या १३ गुणांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानी असून प्ले आॅफमधील जागा निश्चित करण्यासाठी त्यांना आपल्या उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. गतसामन्यात हैदराबादला घरच्या मैदानावर रायझिंग पुणे सुपरजायंटविरुद्ध १२ धावांनी पराभूत व्हावे लागले. विशेष म्हणजे घरच्या मैदानावर हा हैदराबादचा यंदाच्या मोसमातील पहिला पराभव ठरला. हैदराबादची आघाडीची फळी मजबूत असली तरी मधली फळी मात्र कमजोर आहे. त्यामुळे प्रमुख फलंदाज झटपट परतल्यानंतर मोठी धावसंख्या उभारण्यात त्यांना अडचणी येत आहेत. (वृत्तसंस्था)