हुश्शऽऽ मुंबई जिंकली रे...

By Admin | Updated: April 26, 2015 01:40 IST2015-04-26T01:40:46+5:302015-04-26T01:40:46+5:30

पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या मुंबई इंडियन्सने आपल्या कमजोर ठरलेल्या गोलंदाजांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादचे कडवे आव्हान २० धावांनी परतावून लावत यंदाच्या आयपीएलमधील दुसरा विजय मिळवला.

Hush mumbai win | हुश्शऽऽ मुंबई जिंकली रे...

हुश्शऽऽ मुंबई जिंकली रे...

मलिंगाचा निर्णायक मारा : सिमन्सची अर्धशतकी खेळी; सनरायझर्स २० धावांनी पराभूत
रोहित नाईक ल्ल मुंबई
पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या मुंबई इंडियन्सने आपल्या कमजोर ठरलेल्या गोलंदाजांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादचे कडवे आव्हान २० धावांनी परतावून लावत यंदाच्या आयपीएलमधील दुसरा विजय मिळवला. मिचेल मॅक्क्लेनघनने (३/२०) हैदराबादला जखडवून ठेवल्यानंतर शेवटच्या क्षणी लसिथ मलिंगाने (४/२३) केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने बाजी मारली. सात सामन्यातून दुसरा विजय मिळवलेले मुंबई इंडियन्स ४ गुणांसह तळाच्या स्थानी कायम आहेत.
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर लैंडल सिमेन्स (५१), कर्णधार रोहित शर्मा (२४) आणि किएरॉन पोलार्ड (३३) यांच्या जोरावर मुंबईने निर्धारीत २० षटकांत ८ बाद १५७ अशी समाधानकारक मजल मारली. यावेळी पुन्हा एकदा मुंबई पराभव ओढावून घेणार अशी चिन्हे दिसत होती. हैदराबादने देखील झोकात सुरुवात करताना मुंबईला चिंतेत पाडले होते. सलामीवीर शिखर धवनने मुंबईची गोलंदाजी फोडून काढताना तुफानी फटकेबाजी केली. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला धडाकेबाज डेव्हीड वॉर्नर मात्र संथपणे खेळत होता. मलिंगाने वॉर्नरला बाद करुन ही जोडी फोडली खरी, मात्र तो पर्यंत सनरायझर्सच्या ५ षटकांत ४५ धावा फलकावर लागल्या होत्या. यानंतर मॅक्क्लेनघनने धवनला बाद करताना मुंबईच्या मार्गातील मुख्य अडसर दूर करीत हैदराबादची २ बाद ५२ अशी अवस्था केली. त्याचवेळी लोकेश राहूल (२५) आणि रवी बोपारा (२३) यांनी ३६ धावांची भागीदारी करीत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हा एकदा मॅक्क्लेनघनने मुंबईला मोठे यश मिळवून देताना बोपाराला परतवले. यानंतर सामन्यातील खरे नाट्य घडले. मलिंगाने निर्णायक १९वे षटक टाकताना सामन्याचे चित्रच पालटले. या षटकातील पहिल्या, तिसऱ्या व चौथ्या चेंडूवर अनुक्रमे हनुमा विहारी, प्रवीण कुमार आणि डेल स्टेन यांना बाद करीत मलिंगाने हैदराबादला ८ बाद १३७ धावांवर रोखून मुंबईच्या विजयावर शिक्का मारला.

वानखेडेवर
कल्ला
या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सची संघमालकीण नीता अंबानी यांनी मुंबई इंडियन्सच्या ‘एज्युकेशन फॉर आॅल’ या उपक्रम अंतर्गत जवळपास १७ हजार शालेय विद्यार्थ्यांना निमंत्रित केले होते. संपुर्ण सामन्यात मुंबईच्या प्रत्येक चौकार - षटकारावर बच्चेकंपनीने संपुर्ण स्टेडियम दणाणून सोडले. शिवाय सामना जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्स संघाने मैदानावर फेरी मारताना मुलांचा उत्साह आणखी वाढवला. यावेळी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र ठरला तो अर्थातच सचिन तेंडुलकर. त्यामुळे या चिमुकल्यांनी आपल्या लाडक्या सचिनचा जयघोष करीत एकच कल्ला केला.

मुबंई इंडियन्स : लेंडल सिमन्स त्रि. गो. स्टेन ५१, पार्थिव पटेल झे. विहारी गो. स्टेन १७, उन्मुक्त चंद झे धवन गो. प्रवीण कुमार ५, रोहित शर्मा झे. भुवनेश्वर कुमार गो. शर्मा २४, किरॉन पोलार्ड त्रि. गो. भुवनेश्वर कुमार ३३, अंबाती रायुडू झे. बोल्ट गो. भुवनेश्वर कुमार ७, हरभजन सिंग झे. भुवनेश्वर कुमार गो. प्रवीण कुमार ०, जगदीश सुचित नाबाद ९, विनय कुमार झे. ओझा गो. भुवनेश्वर कुमार ०, मिचेल मैक्लनघन नाबाद १; अवांतर : १०; एकूण : ८ बाद १५७; गोलंदाजी : ट्रेंट बोल्ट ४-०-२७-०, भुवनेश्वर कुमार ४-०-२६-३, डेल स्टेन ४-०-३८-२, प्रवीण कुमार ४-०-३५-२, कर्ण शर्मा ४-०-३०-१.

सनराझर्स हैदराबाद : शिखर धवन घे. मलिंगा गो. मॅक्लेनगन ४२, डेव्हिड वॉर्नर झे. रायडू गो. मलिंगा ९, लेकेश राहुल झे. रायडू गो. मॅक्लेनगन २५, नमन ओझा झे. पोलार्ड गो. सुचित ९, रवी बोपारा झे. पांड्या (बदली खेळाडू) गो. मॅक्लेनगन २३, हनुमा विहारी झे. पटेल गो. मलिंगा १६, कर्ण शर्मा नाबाद २, प्रवीण कुमार त्रि. गो. मलिंगा ०, डेल स्टेन झे. पोलार्ड गो. मलिंगा ०, भुवनेश्वर कुमार नाबाद ६; अवांतर : ५; एकूण : ८ बाद १३७; गोलंदाजी : हरभजनसिंग ४-०-३६-०, मिचेल मॅक्लेनगन ४-०-२०-३, लसिथ मलिंगा ४-१-२३-४, जगदीश सुचित ४-०-२५-१, विनयकुमार ४-०-३१-०.

वानखेडेवर पाण्याचा वर्षाव
मुंबई : सामना संपल्यानंतर उपस्थित मुलांनी चांगलाच गोंधळ माजवला. प्रेस बॉक्सच्या वरच्या स्टॅण्ड मधील मुलांनी सामना संपल्यानंतर अचानकपणे पाण्याने भरलेले प्लास्टीक ग्लास फेकण्यास सुरुवात केली. पाहता पाहता इतर मुलांनी देखील स्टॅण्ड वरुन मैदानात पाण्याने भरलेल्या प्लास्टीक ग्लासचा वर्षाव सुरु केला. यावेळी खालच्या बाजूला उभे असलेल्या फोटोग्राफर्सला चांगलाच त्रास झाला. शिवाय हैदराबदच्या तीन चीअर लीडर्सना तर पाण्याचा मारा चुकवण्यासाठी स्पीकरचा आधार घ्यावा लागला. जवळ-जवळ १-२ मिनिटे सुरु असलेला हा प्रकार पाण्याचे ग्लास संपल्यानंतच थांबला. यावेळी मुंबई इंडियन्सच्या स्वयंसेवकांनी मुलांना रोखण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला. मात्र या ‘चिल्लर पार्टी’ समोर त्यांचे काहीही चालले नाही. त्यात कहर म्हणजे ज्यावेळी मुंबई संघ
मैदानावर फेरी मारत असताना
देखील एका टारगट मुलाने एक
ग्लास खेळाडूंच्या दिशेने
भिरकवलाच.

 

Web Title: Hush mumbai win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.