कसा मिळाला मुंबईला ‘एक्स्ट्रा बॉल’?
By Admin | Updated: May 27, 2014 06:13 IST2014-05-27T06:13:33+5:302014-05-27T06:13:33+5:30
वानखेडे स्टेडियमवर काल आयपीएलच्या शेवटच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर धमाकेदार विजय मिळविला

कसा मिळाला मुंबईला ‘एक्स्ट्रा बॉल’?
मुंबई : वानखेडे स्टेडियमवर काल आयपीएलच्या शेवटच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर धमाकेदार विजय मिळविला; पण मुंबईला जो एक्स्ट्रा चेंडू मिळाला तो कसा मिळाला हे पाहणे मनोरंजक आहे. अंबाती रायडू खेळत असताना मुंबईसाठी दोन धावा करणे आवश्यक होते. परंतु तो एक धाव काढून दुसरी धाव काढताना धावचीत झाला. याचा अर्थ धावसंख्या बरोबरीत झाली. पण या वेळी मैदानावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही संघांच्या तंबूत गणिते मांडली जात होती. संघ व्यवस्थापन गणितात व्यस्त होते आणि खेळाडू मैदानातून डगआउटकडे मिळणार्या इशार्याकडे लक्ष ठेवून होते. काही वेळांनी पंचांनी गणित सोडवून मुंबईला आणखी एक संधी असल्याचे जाहीर केले. धावांची बरोबरी झाल्यामुळे विजयासाठी आवश्यक धाव चौकाराने घेतली, तर मुंबई फ्लेआॅफमध्ये पोहोचण्याची संधी होती. मुंबईला राजस्थानच्या १८९ धावांना १४.३ षटकांत (८७ चेंडूंत) पार करणे आवश्यक होते. पण येथे सरासरी धावसंख्येचे गणित खूपच किचकट झाले. मुंबईने १४.३ षटकांत १८९ धावा केल्या तेव्हा त्यांची सरासरी 0.0७८0९९ इतकी झाली. तर राजस्थानची सरासरी 0.0७६८२१ अशी होती. ८८ व्या चेंडूवर मुंबईने एक धाव घेतली असती तर त्यांची धावसंख्या १४.४ षटकांत १९0 अशी झाली असती आणि मुंबईची सरासरी राजस्थानपेक्षा खाली गेली असती. पण १४.४ षटकांत जर धावा १९१ च्या पुढे गेली असती तर सरासरी वाढली असती. पण, मुंबईला दोन धावा घेता येऊ शकत नव्हत्या. कारण १९0 वी धाव घेतली की त्यांचा विजय पूर्ण होणार होता, आणि दुसरी धाव गणतीत धरण्यात आली नसती. पण जर या चेंडूवर चौकार बसला, तर १४.४ षटकांत १९३ धावा होऊन सरासरी वाढणार होती. याचा अर्थ मुंबईकडे केवळ चौकार ठोकण्याशिवाय पर्याय नव्हता. पण समजा हा चेंडू डॉट गेला असता तरीही मुंबई बाहेर पडली नसती. त्यांना पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर चौकार ठोकून विजय मिळविता आला असता. पण १४ व्या षटकात त्यांना विजय मिळविता आला नसता तर १५ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मात्र त्यांना षटकारच ठोकायला हवा होता. यामुळे ९१ चेंडूंत त्यांच्या १९५ धावा होऊन सरासरी राजस्थानपेक्षा पुढे गेली असती. पण इतके सर्व द्राविडी प्राणायम करण्याची वेळच आदित्य तारेने आणू दिली नाही, त्याने जेम्स फॉल्केनरच्या चौथ्याच चेंडूवर षटकार ठोकून सगळा हिशोब पूर्ण करुन टाकला. राजस्थान रॉयल्सच्या व्यवस्थापनाचे शेवटच्या चेंडूचे गणित चुकले आणि हा चेंडू कसा टाकायचा याची सूचना त्याला कोणीही दिली नाही. जर त्याला जरा तरी सूचना दिली गेली असती तर त्याने कदाचित चांगला चेंडू टाकला असता. पण शेवटी या विजयावर मुंबईचा हक्क होता, हे मान्यच करावे लागेल; कारण ट्वेंटी-20 च्या इतिहासात पहिल्यांदाच १४.४ षटकांत १९५ धावा करून त्यांनी विजय मिळविला.