पराभव टाळण्यासाठी यजमानांचा संघर्ष
By Admin | Updated: August 1, 2015 00:30 IST2015-08-01T00:30:35+5:302015-08-01T00:30:35+5:30
सलामीवीर अभिनव मुकुंद (५९), भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहली (४५) आणि श्रेयस अय्यर (४९) यांनी दिलेल्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर भारत ‘अ’ संघ आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध अनौपचारिक

पराभव टाळण्यासाठी यजमानांचा संघर्ष
चेन्नई : सलामीवीर अभिनव मुकुंद (५९), भारतीय कसोटी कर्णधार विराट कोहली (४५) आणि श्रेयस अय्यर (४९) यांनी दिलेल्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर भारत ‘अ’ संघ आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाविरुद्ध अनौपचारिक कसोटी सामन्यात पराभव टाळण्यासाठी संघर्ष करीत आहे. पहिल्या डावात २१४ धावांनी पिछाडीवर पडलेल्या भारत ‘अ’ संघाने आज तिसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात ६ बाद २६५ धावांची मजल मारली. भारत ‘अ’ संघाकडे आता ५१ धावांच्या आघाडी असून चार विकेट शिल्लक आहेत.
त्याआधी, कालच्या ९ बाद ३२९ धावसंख्येवरून पुढे खेळताना आॅस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा पहिला डाव ३४९ धावांत संपुष्टात आला. भारत ‘अ’ संघातर्फे बाबा अपराजितने ८६ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले आणि कसोटी संघात स्थान न मिळालेला डावखुरा फिरकीपटू प्रग्यान ओझाने १०७ धावांत ४ फलंदाजांना तंबूची वाट दाखवली.
पहिल्या डावात पिछाडीवर पडलेल्या भारत ‘अ’ संघाची दुसऱ्या डावात सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार चेतेश्वर पुजारा (११) स्टिव्हन ओकिफेच्या थेट थ्रोवर धावचित झाला. पुजाराने २७ चेंडूंना सामोरे जाताना १ चौकार लगावला. त्यानंतर मुकुंद, विराट, करुण नायर आणि श्रेयस अय्यर यांनी चांगली फलंदाजी करीत संघाचा डाव सावरला. मुकुंदने १६३ चेंडूंना सामोेरे जाताना ५९ धावा फटकावल्या. त्यात ३ चौकार व १ षटकाराचा समावेश आहे. विराटने ४५ धावांची खेळी पाच चाौकार व १ षटकाराने सजवली. नायरने ३४ चेंडूंमध्ये आक्रमक ३१ धावा फटकावताना ७ चौकार ठोकले. श्रेयस अय्यरने ८ चौकारांच्या सहाय्याने ४९ धावा फटकावल्या. मुकुंद व विराट यांनी दुसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. विराटला ओकिफेने क्लीनबोल्ड करीत भारत ‘अ’ संघाला दुसरा धक्का दिला. मुकुंदने नायरसोबत तिसऱ्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. नायरला गुरिंदर संधूने माघारी परतवले. मुकुंद व अय्यर यांनी चौथ्या विकेटासठी ६९ धावांची भागीदारी केली. अर्धशतकी खेळी करणाऱ्या मुकुंदला एश्टन एगरने बाद केले. यजमान संघाने २०३ धावसंख्या असताना चौथी विकेट गमावली. मुकुंद बाद झाल्यानंतर ६ धावांच्या अंतरात अय्यरही माघारी परतला. त्याला ओकिफेने बाद केले. नमन ओझा (३०) आणि अपराजित (नाबद २८) यांनी सहाव्या विकेटसाठी ४७ धावांची भागीदारी केली. तिसऱ्या दिवसाच्या खेळातील काही षटके शिल्लक असताना ओकिफेने ओझाला तंबूचा मार्ग दाखवला. ओझाने ४४ चेंडूंमध्ये ३० धावा फटकावल्या. त्यात ३ चौकार व १ षटकाराचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक
भारत-अ पहिला डाव १३५; आॅस्ट्रेलिया-अ पहिला डाव ३४९; भारत-अ दुसरा डाव : ८३ षटकांत ६ बाद २६७; (अभिनव मुकुंद ५९, श्रेयस अय्यर ४९, विराट कोहली ४५, करुण नायर ३१, नमन ओझा ३0, बाबा अपराजित खेळत आहे २८, चेतेश्वर पुजारा ११, श्रेयस गोपाल खेळत आहे 0, स्टीव्ह ओकीफे ३/८३, गुरिंदर संधू १/७४, एशटन एगर १/७१).