भारतासमोर विजयासाठी यजमान बेल्जियमचे कडवे आव्हान
By Admin | Updated: July 3, 2015 04:23 IST2015-07-03T04:23:32+5:302015-07-03T04:23:32+5:30
भारतीय पुरुष हॉकी संघाला एफआयएच हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत यजमान बेल्जियमच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

भारतासमोर विजयासाठी यजमान बेल्जियमचे कडवे आव्हान
एंटवर्प : भारतीय पुरुष हॉकी संघाला एफआयएच हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत यजमान बेल्जियमच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. शुक्रवारी खेळल्या जाणाऱ्या उपांत्य लढतीत भारताच्या बचाव फळीपुढे यजमान संघाचे आक्रमण रोखण्याचे कडवे आव्हान राहणार आहे.
बेल्जियम संघाच्या कामगिरीमध्ये गेल्या दोन वर्षांत चांगली सुधारणा झाली आहे. त्यामुळे त्यांनी प्रथमच विश्वक्रमवारीत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या भारतीय संघासाठी यजमान संघाचा पराभव करीत अंतिम फेरीत स्थान मिळविणे सोपे नाही. बेल्जियमच्या खेळाडू्ंनी आंतरराष्ट्रीय हॉकी वर्तुळाला दखल घेण्यास भाग पाडले आहे. बेल्जियमने चॅम्पियन्स चॅलेंज स्पर्धेत भारताविरुद्ध विजय मिळविल्यानंतर २०१२ आॅलिम्पिक व २०१४ ची विश्वकप स्पर्धा यामध्येही पराभूत केले होते. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत मेलबोर्न व भुवनेश्वर येथे सलग दोनदा बेल्जियमचा पराभव केला होता.
आपल्यापेक्षा वरचे मानांकन असलेल्या बेल्जियमविरुद्धच्या लढतीसाठी सज्ज असलेल्या भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक पॉल वान एस म्हणाले,‘बेल्जियमविरुद्ध खेळणे आमच्या शैलीसाठी अनुकूल आहे. आम्ही या लढतीसाठी सज्ज आहोत.
वान एस यांच्या मते भारतीय संघ आशियाई संघांना कडवे प्रतिस्पर्धी मानते. बुधवारी मलेशियाविरुद्ध ३-२ ने विजय मिळविताना याची प्रचिती आली.
भारताला या लढतीत कसून मेहनत घ्यावी लागेल. बेल्जियमने बुधवारी उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत फ्रान्सची झुंज ५-४ ने मोडून काढली आणि उपांत्य फेरीत स्थान
निश्चित केले. या लढतीत टॉम बून व कर्णधार जॉन डोहमेन यांनी शानदार खेळ केला.
व्ही.आर. रघुनाथ व रुपिंदर पाल सिंग यांच्या अनुपस्थितीत जसजितसिंगने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करीत भारताची ड्रॅग फ्लिकरची उणीव बऱ्याच अंशी कमी केली. वान एस पुढे म्हणाले, ‘आमच्याकडे अन्य पर्याय आहेत. मला ड्रॅग फ्लिक आवडतो, पण आम्हाला त्यापासून अधिक सावध राहण्याची गरज आहे.’ (वृत्तसंस्था)