‘उम्मीद पे दुनिया कायम !’
By Admin | Updated: February 12, 2015 02:21 IST2015-02-12T02:21:25+5:302015-02-12T02:21:25+5:30
आपले जेतेपद कायम राखण्यासाठी भारत रविवारी पाकिस्तानविरुद्ध मोहीम सुरू करणार आहे.... पण, भारताचा सध्याचा फॉर्म आणि झालेली परवड

‘उम्मीद पे दुनिया कायम !’
आपले जेतेपद कायम राखण्यासाठी भारत रविवारी पाकिस्तानविरुद्ध मोहीम सुरू करणार आहे.... पण, भारताचा सध्याचा फॉर्म आणि झालेली परवड पाहता ते सहज शक्य होईलच असे नाही... चाहत्यांनी तर विश्वचषक स्पर्धेपूर्वीच भारताचा पराभव गृहीत धरला आहे.... तसे झाल्यास त्यांना आश्चर्यही वाटणार नाही... उलट भारताने या परिस्थितीवर मात करून बाजी मारल्याचेच आश्चर्य वाटेल... २०११ च्या विश्वचषकाचा विचार केल्यास भारताला त्या खेळपट्टींची माहिती होती; परंतु आता परिस्थिती बदलली आहे. आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथील खेळपट्ट्या या २०११च्या विश्वचषक स्पर्धेच्या परस्पर विरुद्ध आहेत. आपण भारतीय असल्याने आशावाद हा आपल्याकडे आलाच आणि तोच आशावाद भारत विश्वचषक जिंकेल, असेही सांगत आहे. स्पर्धा संपेपर्यंत आपल्याला ‘उम्मीद पे दुनिया कायम’, असेच मानून चालायला हवे.
खेळाडूंचा फॉर्म आणि गोलंदाजांची वणवण या समस्या ‘जैसे थे’च आहेत. आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये खेळलेल्या वन-डे मालिकेत भारताला सपाटून मार खावा लागला होता. नुकत्याच पार पडलेल्या तिरंगी मालिकेत भारताला अंतिम फेरीही गाठता आली नव्हती, तर शेवटच्या न्यूझीलंड दौऱ्यात भारताला पाचपैकी एकही वन-डे लढत जिंकता आली नव्हती. त्यामुळे आकड्यांवर नजर टाकल्यास भारताची बाजू पडती वाटत असली तरी मजबूत फलंदाजांची फौज ही संघासाठी जमेची बाब आहे. सलामीवीर शिखर धवन, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांची कामगिरी चढ-उताराची आहे. या फलंदाजांची बॅट तळपल्यास प्रतिस्पर्धी संघाच्या चिंधड्या उडाल्याच समजा. मधल्या फळीत विराट कोहली, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी, अंबाती रायडू हे भक्कम पर्याय आहेत. स्टुअर्ट बिन्नी, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन हे फलंदाजीतही योगदान देऊ शकतात. कागदावर पाहिल्यास भारताची फलंदाजी जगातील सर्वोत्तम दिसत आहे; परंतु हे केवळ कागदी वाघ ठरू नये ही अपेक्षा.
गोलंदाजी ही भारतासाठी सर्वांत मोठी डोकेदुखी आहे. सध्याच्या संघात एकही असा गोलंदाज नाही, की जो येथील खेळपट्टींवर प्रभावी मारा करू शकतो. अनुभवाची कमतरता हा मोठा फॅक्टर त्यांच्या अपयशाचे कारण ठरू शकतो. त्यात सर्वाधिक अनुभवी गोलंदाज इशांत शर्मा दुखापतीमुळे माघारी परतल्याने सर्व मदार नवोदितांवर आली आहे.
भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, उमेश यादव व मोहित शर्मा हे गोलंदाज काय छाप सोडतील हे येणारा काळच सांगेल. आणखी एक समस्या आणि ती म्हणजे भारतीय संघ गेल्या वर्षभरात आराम न करता क्रिकेट खेळत आहेत. त्यांना विश्रांती घेण्यासाठी वेळच मिळालेला नाही. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून भारतीय संघ आॅस्ट्रेलियात तळ ठोकून आहे आणि येथील परिस्थितीशी त्यांनी स्वत:ला चांगलेच जुळवून घेतले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत टीकेचा धनी ठरलेला हाच भारतीय संघ कुणास ठाऊक जेतेपदाची माळ पुन्हा एकदा गळ्यात टाकून मिरवेल?