बॅडमिंटन दुहेरीसाठी रियो तिकिटाची आशा : किम टॅन
By Admin | Updated: August 5, 2015 23:35 IST2015-08-05T23:35:20+5:302015-08-05T23:35:20+5:30
पुढील वर्षी होणाऱ्या रियो आॅलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारत बॅडमिंटन दुहेरीसाठी पात्र ठरू शकतो, असा विश्वास पुढील महिन्यात भारतीय राष्ट्रीय बॅडमिंटन संघाशी जोडले

बॅडमिंटन दुहेरीसाठी रियो तिकिटाची आशा : किम टॅन
नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या रियो आॅलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारत बॅडमिंटन दुहेरीसाठी पात्र ठरू शकतो, असा विश्वास पुढील महिन्यात भारतीय राष्ट्रीय बॅडमिंटन संघाशी जोडले जाणारे मलेशियाचे प्रसिद्ध प्रशिक्षक किम टॅन हर यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या महिन्यात पाच वर्षांचा करार करणारे मलेशियाचे प्रशिक्षक किम यांनी ज्वाला गुट्टा-अश्विनी पोनप्पा या महिला दुहेरीच्या आणि बी. सुमित रेड्डी व मनू अत्री हे पुरुष दुहेरीच्या पात्रतेच्या उंबरठ्यावर असल्याचे सांगितले.
किम म्हणाले, ‘‘भारतीय दुहेरी खेळाडूंत पुढील वर्षी होणाऱ्या आॅलिम्पिकला पात्र ठरण्याची क्षमता आहे. जर ते पात्र ठरले तर आॅलिम्पिकमध्ये काहीही होऊ शकते. मी पुढील महिन्यात भारतात पोहोचणार असून आपले योगदान देणार आहे.’’ भारतीय बॅडमिंटन महासंघाने किम यांच्यासोबत करार केल्याने भारताला तज्ज्ञ प्रशिक्षकांची असलेली प्रतीक्षा पुढील महिन्यात संपत आहे. किम यांनी २४ जुलै रोजी दिल्ली येथे करारावर स्वाक्षरी केली आहे आणि ते पुढील महिन्याअखेरीस संघासोबत असण्याची शक्यता आहे. भारतीय संघाच्या व्यूहरचनेविषयीही त्यांना छेडण्यात आले. ते म्हणाले, ‘‘भारतीय संघासाठी माझ्याजवळ कमी आणि प्रदीर्घकालीन योजना आहे. कमी वेळेतील योजना म्हणजे खेळाडू पुढील वर्षी आॅलिम्पिकसाठी पात्र ठरणे आणि प्रदीर्घ योजना म्हणजे ज्युनिअर खेळाडूंना आॅलिम्पिक २0२0 साठी तयार करणे ही आहे. मी भारतात दोन आठवडे व्यतीत केले आहेत आणि ज्युनिअर खेळाडूंबरोबर वेळ व्यतीत केला आहे. त्यातील काहींशी मी चर्चा केली आणि खूप प्रभावित झालो होतो. त्यांच्यात खूप क्षमता असून ते खूप समजदार, शिस्तीचे पालन करणारे आणि एकाग्र असल्याचे मला वाटते. थोड्याशा मार्गदर्शनामुळे ते जागतिक बॅडमिंटनमध्ये उच्च पातळीवर जाऊ शकतात.’’
भारताने प्रतिष्ठित विश्व चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत सर्वांत मोठे पथक उतरवले आहे. त्यात मनू व सुमित आणि प्रणव जॅरी चोपडा व अक्षय दिवालकर पुरुष दुहेरीत देशाचे प्रतिनिधित्व करतील. मिश्र दुहेरीत अरुण विष्णू आणि अपर्णा बालन व कोना तन आणि एन. सिक्की रेड्डी या भारतीय जोड्यांवर देशाची मदार असेल. महिला दुहेरीत ज्वाला व अश्विनी या अनुभवी जोडीशिवाय प्रज्ञा आणि सिक्की व धान्या नायर व मोहित सचदेव देशाचे प्रतिनिधित्व करतील.