महसूल मॉडेलमध्ये सुधारणा होण्याची आशा
By Admin | Updated: November 17, 2015 03:06 IST2015-11-17T03:06:46+5:302015-11-17T03:06:46+5:30
आयसीसीच्या महसूल वाटण्याच्या पद्धतीवर चर्चा होण्याची गरज असून बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर ज्या वेळी आयसीसीच्या चेअरमनपदाची जबाबदारी सांभाळतील त्या वेळी ते कुठले

महसूल मॉडेलमध्ये सुधारणा होण्याची आशा
बंगळुरू : आयसीसीच्या महसूल वाटण्याच्या पद्धतीवर चर्चा होण्याची गरज असून बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर ज्या वेळी आयसीसीच्या चेअरमनपदाची जबाबदारी सांभाळतील त्या वेळी ते कुठले पाऊल उचलतात, यावर लक्ष केंद्रित झाले असल्याचे दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हारुन लोर्गट यांनी म्हटले आहे.
आयसीसीला मिळणाऱ्या मिळकतीचा मोठा भाग भारत, इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियाच्या खात्यात जमा होतो.
भारत आणि दक्षिण आफ्रिका संघांदरम्यान खेळल्या जात असलेल्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना बघण्यासाठी येथे आलेले लोर्गट महसूल वाटण्याच्या पद्धतीबाबत बोलताना म्हणाले, ‘‘सध्या महसूल वाटण्याच्या पद्धतीवर सर्वांची सहमती आहे, पण भविष्यात याची समीक्षा केली जाईल, अशी आशा आहे. शशांक मनोहर आयसीसीला नवी दिशा देण्यासाठी काय उपाययोजना करतात, यावर लक्ष केंद्रित झाले आहे. मनोहर महसूल वाटण्याच्या पद्धतीमध्ये बदल करतील, अशी आशा आहे.’’
आयसीसीचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी लोर्गट यांचे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि आयसीसीचे सध्याचे चेअरमन एन. श्रीनिवासन यांच्यासोबत विशेष चांगले संबंध नव्हते.
श्रीनिवासन यांच्या निर्देशानंतर वादग्रस्त ‘पोझिशन पेपर’ सादर करण्यात आला. त्यामुळे व्यावसायिक लाभाच्या मुद्यावर आयसीसीचे नियंत्रण ‘बिग थ्री’च्या हाती आले.
आयसीसीमध्ये बदल होण्याची आशा आहे का, याबाबत बोलताना लोर्गट म्हणाला, आगेकूच करण्यावर आमचा विश्वास आहे. लोर्गट म्हणाले, ‘‘मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर त्यांच्यासोबत भेट झालेली नाही, पण त्यांची भेट घेण्याची योजना आहे. त्यांची भेट केव्हा होईल, याबाबत उत्सुकता आहे.’’
२०१३ च्या वादानंतर बीसीसीआयसोबत पुन्हा एकदा संबंध सुधारले आहेत. त्या वेळी वादानंतर भारताने दक्षिण आफ्रिकेत दोन कसोटी आणि तीन वन-डे सामन्यांची मालिका खेळली होती. त्यात सामन्यांच्या संख्येत कपात करण्यात आली होती.
(वृत्तसंस्था)