हैदराबादच्या आशा कायम
By Admin | Updated: May 21, 2014 02:36 IST2014-05-21T02:36:05+5:302014-05-21T02:36:05+5:30
रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीला (६७) सूर गवसला खरा, पण त्याची अर्धशतकी खेळी अखेर व्यर्थच ठरली.

हैदराबादच्या आशा कायम
हैदराबाद : रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीला (६७) सूर गवसला खरा, पण त्याची अर्धशतकी खेळी अखेर व्यर्थच ठरली. आयपीएलच्या सातव्या पर्वात मंगळवारी खेळल्या गेलेल्या लढतीत शिखर धवन (५०) व डेव्हिड वॉर्नर (५९) यांनी चमकदार कामगिरीच्या जोरावर यजमान सनरायजर्स हैदराबाद संघाने रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोरचा ७ गडी राखून पराभव करीत प्ले आॅफमध्ये स्थान मिळविण्याच्या आशा कायम राखल्या. या विजयासह हैदराबाद संघाने १२ सामन्यांत १० गुणांची कमाई केली आहे. बॅँगलोर (१२ सामने) संघाच्या खात्यावरही १० गुणांची नोंद आहे. सनरायजर्सने बॅँगलोरचा डाव ६ बाद १६० धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा १९.४ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना शिखर धवन (५० धावा, ३९ चेंडू, ७ चौकार, १ षटकार) व डेव्हिड वॉर्नर (५९ धावा, ४६ चेंडू, ३ चौकार, ४ षटकार) यांनी सलामीला १२.३ षटकांत १०० धावांची भागीदारी करीत हैदराबाद संघाच्या विजयाची मजबूत पायाभरणी केली. नमन ओझाने २० चेंडूंमध्ये २ षटकारांच्या साहाय्याने २४ धावांची खेळी केली. अॅरोन फिंच (नाबाद ११) आणि डॅरेन सॅमी (नाबाद १०) यांनी हैदराबाद संघाला विजयावर शिक्कामोर्तब करून दिले. बॅँगलोर संघातर्फे सर्वाधिक यशस्वी गोलंदाज वरुण अॅरोनने ३६ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. त्याआधी, विराट कोहलीच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोर संघाने सनरायजर्स हैदराबादविरुद्ध ६ बाद १६० धावांची मजल मारली. कोहलीने ४१ चेंडूंना सामोरे जाताना ६७ धावा फटकाविल्या. कोहलीने युवराजसिंगसोबत (२१) तिसर्या विकेटसाठी ५७ धावांची, तर एबी डिव्हिलियर्ससोबत (२९) चौथ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. सनरायजर्सतर्फे भुवनेश्वर कुमारने २७ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. या पर्वात पहिला सामना खेळणारा आॅफ स्पिनर परवेज रसूलने ४ षटकांत २६ धावांच्या मोबदल्यात १ बळी घेतला. ख्रिस गेल (१४ धावा, २० चेंडू) पुन्हा एकादा मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. (वृत्तसंस्था)