हा सन्मान विसरणार नाही : मेरी कोम
By Admin | Updated: January 28, 2015 02:16 IST2015-01-28T02:16:07+5:302015-01-28T02:16:07+5:30
अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबाना यांनी आपल्या भाषणात केलेल्या कौतुकामुळे भारताची अव्वल महिला बॉक्सर एमसी मेरी कोम हिने आनंद व्यक्त केला आहे़

हा सन्मान विसरणार नाही : मेरी कोम
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबाना यांनी आपल्या भाषणात केलेल्या कौतुकामुळे भारताची अव्वल महिला बॉक्सर एमसी मेरी कोम हिने आनंद व्यक्त केला आहे़ हा सन्मान मी कधीच विसरणार नाही, असेही तिने म्हटले आहे़
ओबामा यांनी भारत दौऱ्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी सिरी फोर्ट आॅडिटोरियममधील टाऊन हॉलमधील भाषणात महान धावपटू मिल्खासिंगसह मेरी कोमच्या नावाचा उल्लेख केला होता़
मेरी कोम पुढे म्हणाली, ‘‘अमेरिकेचे राष्ट्रपती माझ्या नावाचा उल्लेख करतील असे वाटले नव्हते; मात्र त्यांनी माझ्या नावाचा उल्लेख केला, याबद्दल मी आभारी आहे़ अनेक वर्षांपासून देशासाठी दिलेल्या योगदानाचा हा सन्मान आहे़ जर कधी राष्ट्रपती ओबामा यांना भेटण्याची संधी मिळाली, तर मी नक्कीच त्यांचे आभार मानेन.’’
दरम्यान, ही आघाडीची महिला बॉक्सर सध्या खांद्याच्या दुखापतीने त्रस्त आहे़ तिने सांगितले, की आता सराव सुरू केला आहे; मात्र दुखापत पूर्णपणे बरी व्हायला किती वेळ लागेल, हे अद्याप सांगता येणार नाही़ (वृत्तसंस्था)