हाँगकाँगची टीन लाऊ उपांत्य फेरीत
By Admin | Updated: July 22, 2016 21:56 IST2016-07-22T21:56:46+5:302016-07-22T21:56:46+5:30
महाराष्ट्राच्या आर्या ओगळे हिने दिलेली कडवी झुंज हाँगकाँगची अव्वल मानांकीत टीन यान लाऊ विरुध्द अपयशी ठरल्याने तीला एनएससीआय इंडियन क्लासिक ज्युनिअर खुल्या स्क्वॉश

हाँगकाँगची टीन लाऊ उपांत्य फेरीत
इंडियन ज्यु. स्क्वॉश : महाराष्ट्राच्या आर्याची अपयशी झुंज
मुंबई : महाराष्ट्राच्या आर्या ओगळे हिने दिलेली कडवी झुंज हाँगकाँगची अव्वल मानांकीत टीन यान लाऊ विरुध्द अपयशी ठरल्याने तीला एनएससीआय इंडियन क्लासिक ज्युनिअर खुल्या स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला. मुलींच्या १५ वर्षांखालील गटात झालेल्या या लढतीत आर्याने टीनला २-३ असे झुंजवले. त्याचवेळी महाराष्ट्राचा अग्रमानांकीत तुषार शहानी याने महाराष्ट्राच्याच ॠत्विक राऊला नमवून मुलांच्या १७वर्षांखालील गटाची उपांत्य फेरी गाठली.
वरळी येथील नॅशनल स्पोटर््स क्लब आॅफ इंडिया (एनएससीआय) येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत आर्याने पहिला गेम जिंकून आश्चर्यकारक सुरुवात करताना टीनला दबावाखाली ठेवले. यानंतर टीनने पुनरागमन करताना बरोबरी साधली. तर तिसरा गेम जिंकताना आर्याने २-१ अशी आघाडी घेतली. मात्र यानंतर टीनने आपला दर्जा सिध्द करताना सलग दोन गेम जिंकताना अर्याची झुंज ९-११, ११-६, ९-११, ११-४, ११-८ अशी मोडली. तसेच पाच गेमपर्यंत रंगलेल्या अन्य चुरशीच्या सामन्यात महाराष्ट्राच्या अवनी नगर हिने धक्कादायक निकाल नोंदवताना द्वितीय मानांकीत तामिळनाडूच्या समिता एस. हिचे आव्हान ११-६, ८-११, १२-१०, ६-११, ११-८ असे संपुष्टात आणले.
मुलांच्या १७ वर्षांखालील गटात अव्वल खेळाडू तुषारने अपेक्षित कामगिरी ॠत्विकचा ११-२, ११-९, ११-९ असा पराभव करुन दिमाखात उपांत्य फेरी गाठली. महाराष्ट्राचा अन्य एक कसलेला खेळाडू वीर छोत्रानी याने देखील सहजपणे उपांत्य फेरी निश्चित करताना दिल्लीच्या गौतम नागपालला ११-७, ११-८, ८-११, ११-४ असे नमवले.
मुलींच्या १७ वर्षांखालील गटामध्ये महाराष्ट्राच्या नवमी शर्माने आक्रमक खेळाच्या जोरावर उत्तर प्रदेशच्या नंदिका कुमारला ११-५, ११-६, ११-५ असे लोळवले. तर अव्वल मानांकीत तामिळनाडूच्या अशिता भेंग्रा हिने गोव्याच्या स्पर्शी मट्टासचा सरळ तीन गेममध्ये ११-४, ११-३, ११-२ असा धुव्वा उडवला. (क्रीडा प्रतिनिधी)