फ्रान्सला होंडुरासचे आव्हान
By Admin | Updated: June 15, 2014 03:11 IST2014-06-15T03:11:20+5:302014-06-15T03:11:20+5:30
पात्रता फेरीचा अडथळा दूर करण्यासाठी अनेक अडचणींना तोंड देत पुढे आलेल्या १९९८च्या चॅम्पियन फ्रान्स संघाला विश्वचषकात सलामीला होंडुरासविरुद्ध विजय मिळविण्याचे आव्हान राहील
फ्रान्सला होंडुरासचे आव्हान
पोर्टो अलेग्रे : पात्रता फेरीचा अडथळा दूर करण्यासाठी अनेक अडचणींना तोंड देत पुढे आलेल्या १९९८च्या चॅम्पियन फ्रान्स संघाला विश्वचषकात सलामीला होंडुरासविरुद्ध विजय मिळविण्याचे आव्हान राहील. २०१० च्या विश्वचषकात फ्रान्सची कामगिरी फारच खराब झाली होती.
फ्रान्सने प्ले आॅफमध्ये युक्रेनवर ३-२ ने विजय मिळवून पात्रता गाठली. या संघाचे नेतृत्व दिदियेर देसचॅप्सकडे आल्यापासून युवा खेळाडूंमध्ये आत्मविश्वास संचारला. त्याचा परिणाम म्हणून सराव सामन्यात फ्रान्सने नॉर्वेवर ४-० ने आणि जमेकावर ८-० ने विजय नोंदविला होता.
या संघाचा स्ट्रायकर आॅलिव्हर गिरोड म्हणाला, ‘आम्ही बदल अनुभवत आहोत. द. आफ्रिकेत खेळाडूंनी केलेला संप आणि खराब कामगिरी प्रशंसक विसरलेले नाहीत. त्या संघातील बरेच खेळाडू सध्या संघात नसल्याने भविष्यात चांगली कामगिरी करण्यावर भर राहील. गेल्या काही महिन्यांत कामगिरीत घसरण झाली, पण चाहत्यांच्या पाठिंब्याच्या बळावर पुन्हा उभे राहू.’
फ्रान्सचा अनुभवी स्ट्रायकर फ्रँक रिबेरी स्पर्धा सुरू होण्याआधीच जखमी झाला. यावर गिरोड म्हणतो, ‘रिबेरीविना संघ चांगली कामगिरी करेल, असा मला विश्वास आहे.’ या संघाचा खेळाडू ग्रिऐजमन संघात स्थान पटकाविण्यास उत्सुक आहे. त्याने ला लीगा स्पर्धेत रियल सोशिएड संघाकडून चार सामन्यांत तीन गोल केले होते.
दुसरीकडे या मोसमात आर्सेनलसाठी २२ गोल नोंदविणारा गिरोड म्हणतो,
‘संघात मुख्य स्ट्रायकरचे स्थान मला
देण्यात यावे.’ रिबेरीचे स्थान रियल माद्रिदचा करिम बिंजेमा घेणार आहे. होंडुरास संघ फ्रान्सला कडवे आव्हान देण्यास सज्ज आहे. (वृत्तसंस्था)