हॉलंडने केला स्पेनचा अफलातून सफाया
By Admin | Updated: June 15, 2014 03:16 IST2014-06-15T03:16:51+5:302014-06-15T03:16:51+5:30
वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेच्या बहुचर्चित अशा ‘अ’ गटाच्या पहिल्याच साखळी सामन्यात नेदरलँडने स्पेनचा ५-१ गोलने धुव्वा उडवून गतविजेत्यांची बोलती बंद करून टाकली.
हॉलंडने केला स्पेनचा अफलातून सफाया
साल्वाडोर : वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेच्या बहुचर्चित अशा ‘अ’ गटाच्या पहिल्याच साखळी सामन्यात नेदरलँडने स्पेनचा ५-१ गोलने धुव्वा उडवून गतविजेत्यांची बोलती बंद करून टाकली.
पूर्वार्धात स्पेनने नेदरलँडवर वर्चस्व राखले. या सत्रात स्पेनने चेंडूवर सर्वाधिक काळ आपला ताबा ठेवला होता. तसेच या सत्रात गतविजेत्या स्पेन आणि उपविजेत्या नेदरलँडमध्ये सामना चांगलाच रंगला. नेदरलॅँडच्या स्टीफनने केलेल्या चुकीमुळे स्पेनला २७व्या मिनिटाला आयतीच पेनल्टी मिळाली. मिळालेल्या पेनल्टीचा फायदा उठवित झॅवी अलान्सोने गोल करून पहिले यश मिळवून देत आपल्या संघाला १-० गोलची आघाडी मिळवून दिली. हा गोल झाल्यानंतर मात्र नेदरलॅँडच्या खेळाडूंनी नियोजनपूर्वक खेळ करण्यास सुरुवात केली. त्यांच्या रॉबी वॅन पर्सीने ४५व्या मिनिटाला हवेत अफलातून सूर मारत हेडरने पहिला गोल करून आपल्या संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली. बरोबरी झाल्यानंतर दोन्ही संघांनी एकमेकांवर आक्रमन करण्यास सुरुवात केली. नेदरलॅँड खेळाडूंनी रचलेल्या चालीत ५३व्या मिनिटाला त्यांच्या आर्येन रॉबेनने गोल करून आपल्या संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ६४व्या मिनिटाला स्टीफनने सेट पीसद्वारा गोल केला आणि नेदरलॅँडची आघाडी ३-१ अशी वाढविली. त्यानंतर केवळ आठच मिनिटांनी स्पेनचा गोलरक्षक कॅसलिसची चूक स्पेनला भोवली आणि रॉबी वॅन पर्सीने स्वत:चा दुसरा तर संघाचा चौथा गोल केला. त्यानंतर ८०व्या मिनिटाला आर्येन रॉबेनने स्वत:चा दुसरा व संघाचा पाचवा गोल करून आघाडी भक्कम केली. (वृत्तसंस्था)