हॉलंडची भारतावर मात
By Admin | Updated: December 1, 2015 03:17 IST2015-12-01T03:17:12+5:302015-12-01T03:17:12+5:30
हॉलंडने मध्यंतरानंतर शानदार कामगिरी करीत तीन गोल नोंदविले आणि यजमान भारताला एफआयएच वर्ल्ड हॉकी लीग फायनल्सच्या ‘ब’ गटातील लढतीत सोमवारी ३-१ ने पराभूत केले.

हॉलंडची भारतावर मात
रायपूर : हॉलंडने मध्यंतरानंतर शानदार कामगिरी करीत तीन गोल नोंदविले आणि यजमान भारताला एफआयएच वर्ल्ड हॉकी लीग फायनल्सच्या ‘ब’ गटातील लढतीत सोमवारी ३-१ ने पराभूत केले.
भारताला या स्पर्धेत तीन सामन्यात दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले. साखळी फेरीत भारताला एका गुणासह गटात अखेरच्या स्थानावर समाधान मानावे लागले.
भारताने पहिल्या सत्रात संघर्षपूर्ण खेळ करीत हॉलंडसारख्या बलाढ्य संघाला गोलशून्य बरोबरीत रोखले. हॉलंडने ३६व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवीत खाते उघडले. वीरडन मिक वान डेरने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवीत हॉलंडला आघाडी मिळवून दिली. मिरको प्रूजसरने ४३व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवीत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. पिछाडीवर पडल्यानंतर यजमान संघाने संघर्षपूर्ण खेळ केला. ४७ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर चिगलेनसाना कंगुजमने गोल नोंदवीत पिछाडी काहीअंशी भरून काढली. भारतीय संघाने त्यानंतर बरोबरी साधण्यासाठी आक्रमक खेळ केला; पण रॉयल बोवेनडर्टने ५४ व्या मिनिटाला गोल नोंदवीत भारताचा संघर्ष संपुष्टात आणला. हॉलंडने ३-१ गोल फरकाने विजयावर शिक्कामोर्तब केले.
या लढतीत हॉलंडचा लिनडेन फ्लोरिस वान डेर आणि भारताच्या रूपिंदर पाल सिंग यांना धुसमुसळ्या खेळासाठी ताकीद देण्यात आली. (वृत्तसंस्था)