हॉकीपटू मोहंमद शाहीद कालवश
By Admin | Updated: July 21, 2016 05:57 IST2016-07-21T05:57:56+5:302016-07-21T05:57:56+5:30
१९८०च्या मॉस्को आॅलिम्पिकमध्ये अखेरचे सुवर्ण मिळवून देणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य

हॉकीपटू मोहंमद शाहीद कालवश
नवी दिल्ली : १९८०च्या मॉस्को आॅलिम्पिकमध्ये अखेरचे सुवर्ण मिळवून देणाऱ्या भारतीय हॉकी संघाचे सदस्य, ‘ड्रिबलिंगचे जादूगार’ म्हणून ख्यातिप्राप्त असलेले महान हॉकी खेळाडू मोहंमद शाहीद यांचे बुधवारी गुडगाव येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून यकृत आणि किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. त्यांच्या मागे पत्नी परवीन शाहीद, मुलगा मोहंमद सैफ व मुलगी हिना शाहीद असा परिवार आहे.
शाहीद यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यापासूनच चाहत्यांनी ते लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली होती; पण आज सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. शाहीद यांच्या निधनासोबत भारतीय हॉकीचा एक सुवर्ण अध्याय संपला. जगातील आक्रमक फळीतील खेळाडूंपैकी एक दिग्गज तसेच ‘ड्रिबलिंगचा बादशाह’ अशी ख्याती असलेले शाहीद यांनी भारतीय संघाला मॉस्कोमध्ये अखेरचे आॅलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिले. १९८२ व १९८६च्या एशियाडमध्ये पदकविजेत्या भारतीय संघाचेदेखील ते सदस्य होते. शाहीद यांच्या पोटात दुखणे उमळल्यानंतर बनारस विश्वविद्यालयाच्या एसएसएल रुग्णालयातून त्यांना गुडगावच्या मेदांता रुग्णालयात हलविण्यात आले. आधुनिक उपचार प्रणालीसाठी त्यांना वाराणसीहून येथे आणण्यात आले. रेल्वे आणि केंद्र शासनाने त्यांच्या उपचारांवरील खर्च केला; पण प्रकृती सतत ढासळत गेल्याने तीन आठवड्यांच्या उपचारांनंतर अखेर कृत्रिम श्वासोच्छ्वास (व्हेंटिलेटर) पुरविण्यात आला. शाहीद यांचे पार्थिव वाराणसी येथे नेण्यात येणार असून, तेथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. (वृत्तसंस्था)
>अल्प परिचय...
उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे १४ एप्रिल १९६० रोजी जन्मलेले शाहीद यांना १९८०च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत ‘सर्वोत्कृष्ट फॉरवर्ड’ म्हणून गौरविण्यात आले होते.१९८६च्या आॅल स्टार आशियाई संघातही त्यांना स्थान मिळाले. १९८०-८१मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार तसेच १९८६मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. वेगवान खेळ आणि शानदार ड्रिबलिंगच्या बळावर प्रतिस्पर्धी बचावफळी भेदण्यात ‘माहीर’ असलेले शाहीद यांचा स्वत:चा चाहता वर्ग होता. १९८५-८६मध्ये ते भारतीय संघाचे कर्णधार बनले. निवृत्तीनंतर त्यांनी वाराणसीत भारतीय रेल्वेत सेवा केली. शाहीद-जफर इक्बाल या जोडीने त्या काळी जागतिक हॉकीत धडकी भरविली होती. भारतीय रेल्वेत क्रीडा अधिकारी राहिलेले शाहीद यांची प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी क्रीडामंत्री
विजय गोयल यांनी काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. आजही त्यांनी गुडगाव येथे भेटून शाहीद यांच्या पत्नी आणि मुलांचे सांत्वन केले.
>मान्यवरांची श्रद्धांजली....
देशाने महान खेळाडू गमावला
देशाने महान हॉकीपटू गमावला. आम्ही शाहीद यांना वाचविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले; पण मदत आणि प्रार्थना अपुरी पडली. शाहीद हे समर्पित वृत्तीने स्वत:ला खेळात झोकून द्यायचे. त्यांची उणीव भरून निघणे कठीण आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान.
>शाहीद माझे हीरो होते : कपिलदेव
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांनी हॉकीपटू मोहम्मद शाहीद यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले, शाहीद माझे हीरो होते. कपिल म्हणाले, ‘मला वाटले होते की, ते या आजारातून बरे होतील. शाहीद एक जबरदस्त खेळाडू होते. ते मैदानावर सर्वांत आकर्षक खेळाडू होते. त्यांच्याविषयी पाकिस्तानी खेळाडूंना विचारले तर ते सांगतील की ते शाहीद यांचा किती आदर करीत होते.’