हॉकीला ‘अच्छे दिन’ कधी?
By Admin | Updated: July 18, 2016 04:27 IST2016-07-18T04:27:21+5:302016-07-18T04:27:21+5:30
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईकरांच्या हॉकीपटूंचा दबदबा असायचा. किंबहुना, राष्ट्रीय संघाचा गोलरक्षक हा मुंबईचाच असायचा, ही जणू परंपरा बनली होती

हॉकीला ‘अच्छे दिन’ कधी?
महेश चेमटे,
मुंबई- राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मुंबईकरांच्या हॉकीपटूंचा दबदबा असायचा. किंबहुना, राष्ट्रीय संघाचा गोलरक्षक हा मुंबईचाच असायचा, ही जणू परंपरा बनली होती. सध्या मात्र, हॉकी खेळाचे चित्र पालटले आहे. मुंबईतील व्यावसायिक हॉकी खेळणाऱ्या संघांची संख्या दिवसेंदिवस घटते आहे. पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, इंडियन आॅइल असे हॉकीचे काही संघ आहेत. कंपन्यांकडून खेळणाऱ्या तब्बल ३२ टीम होत्या, पण त्यादेखील बोटावर मोजता येतील, एवढ्याच शिल्लक आहेत.
काही कंपन्यांवर हॉकीपटू आयात करण्याची वेळ आली आहे. याबाबत एका कंपनीतील क्रीडा अधिकाऱ्याला विचारले असता, मुंबईत चांगले हॉकीपटू नाहीत, त्यामुळे नाईलाजास्तव आम्हाला दुसऱ्या शहरांतील हॉकीपटूंना संघात स्थान द्यावे लागते, असे या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. मुळात, शाळा-महाविद्यालयीन स्तरावर खेळाडू तयार होत नसल्याने, राज्य हॉकी स्पर्धेत दुसऱ्या राज्यातून हॉकीपटू आयात करण्याची वेळ या संघांवर आलेली आहे. हॉकी संघटनेतदेखील स्थापनेपासून वाद आहेत. सुरुवातीला संघटनेत नामवंतांना स्थान देण्यात आले होते. यात दिवंगत अभिनेते प्राण यांच्यापासून काही हास्य अभिनेत्यांचा समावेश होता. हॉकीकडे खेळाडू आकृष्ट व्हावेत, हा हेतू त्यामागे होता.
हॉकी खेळाच्या आजमितीला डझनभर संघटना अस्तित्त्वात आहे. भरीस भर म्हणजे, काही संघटना ‘तू-तू-मैं-मैं’करत असल्याने हॉकीला ‘अच्छे दिन’ येण्याची शक्यता सध्या धूसर आहे. काही संघटना याही पुढे जात सध्या कोर्टाच्या पायऱ्या झिजवत आहेत. नुकतीच गुरु तेग बदाहूर हॉकी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेकडे प्रेक्षकांनी अक्षरश: पाठ फिरवली. काही वर्षांपर्यंत याच सामन्यासाठी तिकिटांची रांग लागत असे. यंदा ही रांग दिसली. मात्र, ती हॉकी गोल्ड कपसाठी नसून आयपीएल सामन्यांच्या तिकिटांसाठी होती. ही परिस्थिती हॉकीची दयनीय अवस्था स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहे. आज आॅलिंम्पिकमध्ये भारताच्या संघात मुंबईचा केवळ एकमेव खेळाडू आहे. साधारणपणे प्रत्येक आॅलिंम्पिकमध्ये मुंबईचे २ ते ३ खेळाडू असायचेच. १९८४ आॅलिंम्पिक संघात मुंबईचे एम.एन.सोमैया, एम गोम्स, इक्बालजीत सिंग, मार्विन फर्नांडिस आणि जोकिम कारवालो असे पाच खेळाडू होते. त्या आधीच्या संघातदेखील मुंबईच्या खेळाडूंचा राष्ट्रीय संघात दबदबा होता. मात्र, सध्या हॉकीची अवस्था दयनीय आहे, असे मत जोकिम कारवालो यांनी व्यक्त केले. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रातील स्थिती फारशी वेगळी नाही. राज्यात हॉकी स्टेडियम आणि अॅस्ट्रोटर्फची संख्या अवघी पाच आहे, शिवाय काही स्टेडियम सांभाळणारी मंडळी हे हॉकीपटू घडवण्यापेक्षा वाद जोपासणे कर्तव्य मानत आहेत. (क्रमश: )
>हो... मुंबईत हॉकी मरतेय!
शालेय स्तरावरील हॉकी संपुष्टात येत असल्याने, कंपन्यामध्ये हॉकी संघ तयार होत नाही. हॉकी संघटनेकडे हॉकी प्रचार-प्रसारासाठी कोणतेही ‘प्लॅन’ नाही. मुंबई हॉकी संघात मुंबईबाहेरील खेळाडूंचा भरणा आहे. गत काही वर्षांत हॉकी खेळाचा शहरातील आलेख पाहता, हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्याव्यतिरिक्त हॉकी संघटना या नात्याने, हॉकी खेळाच्या प्रगतीसाठी कोणतेही प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. संघटनेत जे खेळाडू पदाधिकारी म्हणून आहेत, तेदेखील केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याने त्याचा फटका हॉकीला बसतो. अॅस्ट्रोटर्फमुळे पावसातदेखील हॉकीच्या स्पर्धा खेळता येणे शक्य आहे.
- जोकिम कार्व्हालो, आॅलिंपियन, अर्जुन पुरस्कार विजेते
>‘अॅस्टोटर्फची पुरेशी काळजी’
मुंबईतील हॉकी स्टेडियममधील अॅस्टोटर्फ हे पुढील चार वर्षे सुस्थितीत राहील असे दिसते. संघटनेतर्फे आम्ही योग्य ती काळजी घेत आहोत. वेळोवेळी टर्फवर पाणी मारले जाते. त्याचबरोबर, अॅस्टोटर्फ स्वच्छ ठेवण्यात येते. सध्या पावसामुळे हॉकी स्पर्धा थांबवल्या आहेत. आॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या मुंबईत राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत सर्वाधिक स्पर्धा खेळवल्या जात आहेत.
- मंगासिंग बक्षी, अध्यक्ष, मुंबई हॉकी संघटना