इतिहास घडविला..!
By Admin | Updated: May 23, 2014 02:00 IST2014-05-23T02:00:37+5:302014-05-23T02:00:37+5:30
सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय महिला बॅडमिंटन संघाने इतिहास घडविला.

इतिहास घडविला..!
नवी दिल्ली : सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांच्या नेतृत्त्वाखालील भारतीय महिला बॅडमिंटन संघाने इतिहास घडविला. गुरुवारी त्यांनी इंडोनेशियाला ३-0 ने हरवून उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदा सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. येथील सिरी फोर्ट स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये आठवी मानांकित सायना नेहवालने पहिल्या एकेरी सामन्यात २३ वी मानांकित लिंडावेनी फानेत्रीला २१-१७, २१-१० अशा सरळ सेटमध्ये हरवून भारताला १-0 अशी आघाडी मिळवून दिली. परंतु भारताच्या पीव्ही सिंधूला बेलाट्रिक्स मानुपट्टीविरुध्द २१-१६, १0-२१, २५-२३ असा विजय मिळविण्यासाठी सुमारे दीड तास घाम गाळावा लागला. सिंधूने पहिला गेम जिंकला मात्र दुसर्या गेममध्ये ती सहज हरली. शेवटच्या आणि तिसर्या निर्णायक गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये एका एका पॉर्इंटसाठी जबरदस्त संघर्ष पहायला मिळाला. परंतु स्थानिक प्रेक्षकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे विजय मिळविण्यास सिंधूला यश आले. भारतीय संघ आपल्या गटात अपराजित राहीला आहे. त्यांनी कॅनडा, हाँगकॉग आणि थायलंडला पराभूत केले आहे. इंडोनेशियाचा संघ त्यांच्या गटात दुसर्या क्रमांकावर राहीला. भारताचा संघ स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. गेल्या स्पर्धेत भारताला या स्पर्धेची पात्रताही मिळविता आली नव्हती. २0१0 साली उपांत्यपूर्व फेरीत इंडोनेशियाकडून 0-३ ने पराभूत व्हावे लागले होते. (वृत्तसंस्था)