...त्याचे दडपण आले
By Admin | Updated: April 17, 2016 03:32 IST2016-04-17T03:32:22+5:302016-04-17T03:32:22+5:30
काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती मला म्हणाली, की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसंघाचे सुरुवातीचे तीन फलंदाज मला बार्सिलोनाच्या तीन स्ट्रायकर्सची आठवण करून देतात. मेस्सी, सुआरेज आणि नेमार

...त्याचे दडपण आले
- एबी डिव्हिलियर्स लिहितो़...
काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती मला म्हणाली, की रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसंघाचे सुरुवातीचे तीन फलंदाज मला बार्सिलोनाच्या तीन स्ट्रायकर्सची आठवण करून देतात. मेस्सी, सुआरेज आणि नेमार बार्सिलोनाचे प्रतिनिधित्व करीत असताना त्यांची चमकदार कामगिरी बघणे सुखद वाटते. क्रिकेटची चर्चा केली तर आरसीबी संघात ख्रिस गेल व विराट कोहलीच्या साथीने तुझ्या समावेशाने ही तिकडी पूर्ण होते, असेही तो म्हणाला. मी त्याला यासाठी धन्यवाद दिले, पण सुपरस्टार फुटबॉलपटूंसोबतच्या तुलनेमुळे दडपण आल्यासारखे वाटले.
वास्तविक आम्ही तिन्ही क्रिकेटपटू आरसीबी संघाचे केवळ तीन खेळाडू आहोत. केवळ आयपीएलच्या या मोसमात आपल्या क्षमतेनुसार खेळ करण्यासाठी मैदानावर उतरण्यास सज्ज आहोत. संघाविना आणि अन्य खेळाडूंचे सहकार्य लाभले नाही तर आम्ही आगेकूच करू शकत नाही. एक संघ म्हणून आम्ही एकमेकांसाठी उभे असतो. आम्ही सांघिक कामगिरीच्या जोरावर चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात करू शकलो, पण अद्याप बराच मोठा पल्ला गाठायचा आहे, याची आम्हाला चांगली कल्पना आहे.
गेल व विराट यांच्यासारख्या खेळाडूंसोबत गेल्या काही मोसमामध्ये खेळण्याची संधी मिळाल्यामुळे मी स्वत:ला नशिबवान समजतो. या कालावधीत आम्ही एकमेकांना खेळाडू व व्यक्ती म्हणून समजून घेतले. या कालावधीत आम्ही एकमेकांचे चांगले मित्र झालो. आमच्यात कुठली स्पर्धा नाही. आम्ही सोबत खेळतो व एकमेकांचा उत्साह वाढवितो. एकमेकांच्या अनुभवाचा संघाच्या हितासाठी वापर करतो. गेल व विराट वेगवेगळे खेळाडू आहेत. विराट जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याच्यातील चेंडूला मोजून मापून सीमारेषेबाहेर पाठविण्याच्या क्षमतेची तुलना अन्य कुणासोबत करता येणार नाही. त्याची ‘रनिंग बिटविन द विकेट’ शानदार आहे.
गेलची गणना जगातील दिग्गज खेळाडूंमध्ये होते. त्याला ‘पॉवर गेम’चा मास्टर मानले जाते. तो परिस्थिती ओळखून व गोलंदाजाची कमकुवत बाजू समजून त्याचा लाभ घेण्यास सक्षम आहे. तो आक्रमक खेळी करण्यात माहिर आहे. कमकुवत चेंडू मैदानाच्या कुठल्याही भागात भिरकावण्यास तो सक्षम आहे. मी विराट व गेलच्या फलंदाजीचा विशेषत: दुसऱ्या टोकाला उभा राहून आनंद घेतो. त्याचप्रमाणे यंदाच्या मोसमात शेन वॉटसन आरसीबी संघासोबत जुळला आहे. ही आमच्यासाठी चांगली बाब आहे. मी आॅस्ट्रेलियन गोलंदाजांचा प्रशंसक आहे. ते फलंदाजाला बाद करण्यासाठी गृहपाठ करतात, हे विशेष. (टीसीएम)