हिकेन शाहची न्यायालयात धाव!

By Admin | Updated: August 9, 2015 22:36 IST2015-08-09T22:36:04+5:302015-08-09T22:36:04+5:30

फिक्सिंगच्या कथित आरोपांमुळे प्रथम श्रेणी क्रिकेटमधून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या बंदीचा सामना करणारा मुंबईचा फलंदाज हिकेन शाह याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे

Hiken Shah runs in court! | हिकेन शाहची न्यायालयात धाव!

हिकेन शाहची न्यायालयात धाव!

मुंबई : फिक्सिंगच्या कथित आरोपांमुळे प्रथम श्रेणी क्रिकेटमधून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या बंदीचा सामना करणारा मुंबईचा फलंदाज हिकेन शाह याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याच्या या अपिलावर ११ आॅगस्ट रोजी सुनावणी होईल. हिकेनकडून त्याचे वकील सोम सिन्हा यांनी गेल्या आठवड्यात न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायाधीश व्ही. एम. कनाडे आणि न्यायाधीश बी. पी. कोलाबावाला यांच्या दोन सदस्यीय खंडपीठाने ही सुनावणी केली. त्यांनी हिकेनला सध्यातरी काही दिलासा दिला नाही. मात्र, बीसीसीआयकडून लेखी स्वरूपात उत्तर मागविले आहे. आता पुढील सुनावणी ११ रोजी होईल. यासंदर्भात, हिकेन म्हणाला, मी निर्दाेष असून यासाठी संघर्ष करणार आहे.
सूत्रांनुसार, बीसीसीआयने हिकेनविरुद्ध कथित आरोपांवर कोणत्याही प्रकारची माहिती न देता त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. याच विषयाला केंद्रस्थानी धरून ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याबरोबरच हिकेनने इंग्लंड येथे खेळण्यासाठी परवागनी मिळावी, अशी मागणी केली आहे.
गेल्या महिन्यात जुलैमध्ये बीसीसीआयने हिकेनच्या निलंबनाबाबत म्हटले होते की, हिकेनने प्रथम श्रेणी क्रिकेटच्या आपल्या साथीदाराला फिक्सिंगसाठी प्रवृत्त केले होते. जो आयपीएलमधील एका संघाचा सदस्य होता. त्यानंतर या खेळाडूने ही माहिती फ्रेन्चायझीला दिली आणि त्यानंतर त्यांनी बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी समितीला कळविले. त्यावर बीसीसीआयचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी यासंदर्भात
चौकशी करण्याचे आदेश दिले
होते. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Hiken Shah runs in court!