Who is Divya Deshmukh: विदर्भातील युवा प्रतिभावंत बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली खास छाप सोडताना दिसत आहे. लंडन येथील जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेत १८ वर्षीय दिव्या देशमुख हिने चीनच्या नंबर वन हू यिफान (Hou Yifan) हिला शह देत सर्वांचे लक्षवेधून घेतले. तिच्या या कामगिरीबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास पोस्टच्या माध्यमातून युवा बुद्धिबळपटूची पाठ थोपटली आहे.
अन् मराठमोळ्या दिव्यानं दिला चीनच्या नंबर वन बुद्धिबळपटूला दिला शह
WR बुद्धिबळ संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या यिफान हिने राउंड-रॉबिन सेमीफायनल लढतीत दिव्याला शह दिला होता. पण दुसऱ्या फेरीत मराठमोठ्या दिव्या देशमुख हिने दमदार कमबॅक करत पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळताना जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत अव्वलस्थानावर विराजमान असलेल्या होउ यिफान हिला पराभूत करुन दाखवलं.
विदर्भाच्या कन्येसाठी PM मोदींनी लिहिली खास पोस्ट
दिव्या देशमुखच्या दिमाखदार कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा आणि प्रतिभावंत बुद्धिबळपटूचं कौतुक केलं आहे. मोदींनी एक्स अकाउंटवरुन एक खास पोस्ट शेअर केलीये. यात त्यांनी लिहिलंय की, लंडन येथील जागतिक ब्लिट्झ बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये जगातील नंबर वन खेळाडू हू यिफानला पराभूत करणाऱ्या दिव्याचं खूप खूप अभिनंदन. तिचे हे यश धैर्य आणि दृढ संकल्पाचे एक उत्तम उदाहरण आहे. युवा खेळाडूंनाही यामुळे प्रेरणा मिळेल. भविष्यातील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दांत मोदींनी विदर्भाच्या लेकीला 'शाब्बासकी' दिलीये.
PM मोदींकडून कौतुक होणं प्रेरणादायी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टवर दिव्या देशमुख हिनेही रिप्लाय दिला आहे. याशिवाय पीटीआयशी संवाद साधताना तिने पंतप्रधानांचे शब्द हे प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे. ती म्हणाली आहे की, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक होणं ही सन्मानाची बाब आहे. पंतप्रधानांनी माझ्याबद्दल जे लिहिलं ते प्रेरणादायी आहे. वेळोवेळी त्यांनी वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे. मी देशासाठी आणखी काही पदके मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असेल.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोण आहे दिव्या देशमुख?
दिव्या देशमुख हे नाव सध्या बुद्धिबळ क्रीडा क्षेत्रात जगभरात गाजत आहे. ९ डिसेंबर २००५ मध्ये नागपूरमध्ये जन्मलेली दिव्या वयाच्या पाचव्या वर्षांपासून बुद्धिबळ खेळते. तिची आई नम्रता आणि वडील जितेंद्र हे दोघेही डॉक्टर आहेत. दिव्यानं २०१२ मध्ये ७ वर्षांखालील वयोगटातील राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर अंडर-१० (डरबन,२०१४) आणि अंडर-१२ (ब्राझील, २०१७) तिने जागतिक स्तरावरील स्पर्धेत छाप सोडली. दिव्यानं महिला FIDE मास्टर झाल्यावर ऑक्टोबर २०२१ मध्ये महिला ग्रँडमास्टर (WGM) चा किताबही पटकवलाय.