'तिच्या' जिद्दीची यशोगाधा..!
By Admin | Updated: August 8, 2016 21:17 IST2016-08-08T21:17:45+5:302016-08-08T21:17:45+5:30
रिओ ऑलिम्पिक मध्ये पोहण्याच्या शर्यतीत भाग घेणार्या या मुलीने जीद्दीचं आणि शौर्याचं एक अनोखं उदाहरण जगासमोर आणलं आहे.

'तिच्या' जिद्दीची यशोगाधा..!
रिओ ऑलिम्पिक मध्ये पोहण्याच्या शर्यतीत भाग घेणार्या या मुलीने जीद्दीचं आणि शौर्याचं एक अनोखं उदाहरण जगासमोर आणलं आहे.
युसरा या ऑलिम्पिक मध्ये कोणत्याच देशाचं प्रतीनीधीत्व करत नाही आहे. ती निर्वासितांच्या ( Refugee Camp) संघाकडून खेळत आहे. जिचं घर नाही, कुटुंब नाही आणि स्वतःचा असा देशही नाही......अशी युसरा ही मुळची सिरीया मधली. तिथे झालेल्या एका महाभयंकर हल्ल्यामध्ये तिचं घरच नव्हे तर पुर्ण शहर उध्वस्त झालं.
अनेक वर्ष सतत होत असलेल्या बॉम्ब हल्ल्यांपासून बचाव करण्यात घालवून नंतर तिने आणि तिच्या धाकट्या बहिणीने सिरीया मधून पळून जाण्याचा निर्णय घेतला. लपत छपत, अतीरेकी, तस्कर आणि पोलीसांपासून बचाव करत त्या दोघींनी दमास्कस, बैरुत, लेबेनॉन आणि तुर्की असा खडतर प्रवास केला. तिथून कसंबसं पोलीसांची नजर चुकवून एका छोट्या बोटीने त्या ग्रीसच्या किनार्यावर जात होत्या.
पण दुर्दैवाने त्या बोटीचं इंजिन मध्येच बंद पडलं. ६ माणसं मावतील इतक्या लहान बोटीत २० लोक भरले होते आणि आता इंजिन बंद पडल्याने भर समुद्रात एकटे पडले होते.
त्या बोटीमधील युसरा, तिची बहिण आणि इतर दोघांनाच पोहता येत होतं. त्या चौघांनी पाण्यात उडी मारून सोबत बोट खेचून नेण्याचा निर्णय घेतला. संध्याकाळची वेळ, खवळलेला समुद्र आणि गोठविणारी थंडी यांचा सामना करत त्यांनी बोट खेचायला सुरुवात केली खरी. पण लवकरच इतर दोघे पुरुष आणि युसराची लहान बहिण थकली आणि त्यांनी प्रयत्न सोडले. युसराने मात्र विचार केला की "मी एक जलतरणपटू आहे आणि तरीही माझा मृत्यु पाण्यात होणार हे काही बरं नाही, यासाठी मी एवढी मेहनत केली नव्हती." . तेव्हा केवळ १७ वर्षाच्या असलेल्या या जिद्दी मुलीने ४ तास पोहत ती बोट शेवटी किनार्याला आणली. आपलेच नव्हे तर आणखी २० जणांचे प्राण वाचविले.
एवढ्यावर तिची संकंटं संपली नाहीत तर कडाक्याच्या थंडीत अंगावर पुरेसे गरम कपडे , पायात बूट नसताना तिने तिच्या बहिणीसोबत तिने ग्रीस, सर्बीया आणि हंगेरी असा तीन देशांचा प्रवास चालत पुर्ण केला आणि शेवटी जर्मनी गाठली. मोठ्या संकटांचा सामना करत जर्मनीमध्ये आश्रीत म्हणून राहू लागली.
पोहण्याची ओढ मात्र तिला स्वस्थ बसू देत नव्हती. एका इजिप्शेयन दुभाष्याच्या मदतीने तिने एका लोकल स्वीमींग क्लबला भेट दिली. तिचे पोहण्यातील कसब पाहिल्यानंतर मात्र त्या स्वीमींग क्लबमधील प्रशीक्षकांना नाही म्हणताच आले नाही.
आणि त्यानंतर काही दिवसांतच ऑलीम्पीक मध्ये पहिल्यांदाच "निर्वासीतांचा संघ" समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. दहा जणांच्या या संघामध्ये १८ वर्षांची युसरा पण आहे. आज संध्याकाळी रिओ मध्ये होणार्या ऑलीम्पीक स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ती हजर असणार आहे. कितीही कठीण आयुष्य असलं तरी हार न मानता पुढे जायचंच, आयुष्याच्या खेळात
जिंकायचच हा संदेश युसरा जगाला देत आहे.
आपलं दु:ख कवटाळत बसणार्या, नशीबच फुटकं म्हणणार्या सर्वांना या १८ वर्षांच्या मुलीची कथा एक नवी दिशा देईल अशी मला आशा आहे.
(साभार - नेटभेट डॉट कॉम)